Satara News: खंबाटकी घाटात कंटेनर अपघाताने आगडोंब, ब्रेक निकामी झाल्याने उताराने पाठीमागील कंटेनरला धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 12:00 PM2023-01-09T12:00:20+5:302023-01-09T12:00:46+5:30
सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही
खंडाळा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील दत्त मंदिराजवळ रविवारी दुपारी बाराच्या सुमारास एका कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. त्यानंतर तो उताराने पाठीमागे असलेल्या कंटेनरवर आदळला. यावेळी टँकरच्या डिझेल टाकीला आग लागली. यामध्ये दोन्ही कंटेनरने पेट घेतला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खंबाटकी घाटात साताऱ्याच्या दिशेने कपडे घेऊन जाणारा कंटेनर (जीजे २७ एक्स ६१९९) या गाडीचा रविवारी दुपारी एकच्या दरम्यान ब्रेक निकामी झाला. दत्त मंदिराजवळ वळणावर ट्रक मागे येऊ लागला. यावेळी पाठीमागून चारचाकी गाड्या घेऊन निघालेल्या कंटेनरवर येऊन धडकला.
या अपघातात डिझेल टाकी फुटल्याने केबीन व दुसऱ्या कंटेनरच्या पाठीमागील बाजूने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच खंडाळा व महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. सायंकाळी चार वाजेपर्यंत आग विझविणे सुरू होते.
घाटात रांगा...
खंबाटकी घाटात कंटेनरला आग लागल्याने आगीचा मोठा भडका उडाला होता. धुराचा लोट सर्वत्र पसरल्याने आणि कंटेनरला लागलेल्या आगीचा स्फोट होण्याच्या भीतीने इतर वाहने घाटात जागीच थांबली होती. मुळात या ठिकाणी रस्ता एकेरी असल्याने बाजूने वाहने जाणे शक्य होत नव्हते. घाटातील वाहतूक ठप्प झाल्याने अनेक वाहने बोगदा मार्गे जाऊ लागली.
त्यामुळे साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना अडथळा होऊ लागला. यामुळेच बोगद्यापासून वेळे बाजूकडील महामार्गावर रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या रांगा सात किलोमीटर पेक्षाही जास्त होत्या. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.