कंत्राटदारांचा कामबंद आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:40 AM2021-04-08T04:40:22+5:302021-04-08T04:40:22+5:30
फलटण महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेच्या विविध मागण्यांसाठी १५ एप्रिलपासून राज्यभर काम बंद आंदोलन करण्यात येणार ...
फलटण
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेच्या विविध मागण्यांसाठी १५ एप्रिलपासून राज्यभर काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सिकंदर डांगे यांनी दिली आहे.
कंत्राटदारांची गेल्या दोन वर्षांपासूनची देणी राज्य सरकारने दिली नसल्याने कंत्राटदारांमध्ये असंतोष असून अनेकजण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. राज्य शासनाला अनेक वेळा इशारे देऊनही ते देणे देत नसल्याने आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागत आहे, असे सिकंदर डांगे यांनी स्पष्ट केले.
१५ एप्रिलपासून राज्यभरात विविध ठिकाणी काम बंद आंदोलनाला प्रारंभ होईल. त्यानंतर तीन मे रोजी राज्यभरात सर्वत्र भीक मांगो आंदोलन होणार आहे, असे डांगे यांनी सांगितले. नुकतेच राज्यभरातील कंत्राटदार यांच्या उपस्थितीत विविध प्रश्नाबाबत व समस्यांबाबत पदाधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होऊन राज्यातील सर्व कंत्राटदारांची सर्व प्रलंबित देयके देण्यासाठीचा निधी शासनाने १५ एप्रिलपूर्वी वितरित करावा, थकीत बिले जोपर्यंत वितरित होत नाहीत, तोपर्यंत नवीन प्रक्रिया करू नये, प्रस्तावित नवीन कामांना शासनाच्या अर्थ विभागाकडून ५० टक्के निधीची तरतूद केल्याशिवाय व मंजुरी मिळाल्याशिवाय कोणतीही निविदा प्रक्रिया शासनाने करू नये, अशी मागणी यावेळी संघटनेतर्फे करण्यात आल्याचे सिकंदर डांगे यांनी सांगितले.