झेडपीमधील कोरोना बाधित कर्मचारी संख्या ७६९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:41 AM2021-01-13T05:41:58+5:302021-01-13T05:41:58+5:30
सातारा : जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत कोरोना बाधित कर्मचाऱ्यांची संख्या ७६९ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १७ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी ...
सातारा : जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत कोरोना बाधित कर्मचाऱ्यांची संख्या ७६९ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १७ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी गेला असून ७३७ कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर सध्या १५ जणांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्याच्या उत्तरार्धात आढळला. त्यानंतर विविध गावाबरोबरच शासकीय विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला. तर जिल्हा परिषदेत जुलै महिन्यात कोरोना पोहोचला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक विभागात कोरोनाचा शिरकाव झाला. आतापर्यंत अर्थ, रोजगार हमी योजना, बांधकाम, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य आदी विभागात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कर्मचारी आणि अधिकारीही कोरोना बाधित होत आहेत. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या एकूण ७६९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा तालुक्यात कार्यरत १३६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कऱ्हाडमध्ये १०९, कोरेगाव १३०, खटाव ६९, खंडाळा ३७, जावळी २७, पाटण ८३, फलटण ४८, महाबळेश्वर ३३, माण ४१ आणि वाई तालुक्यात कार्यरत असणाऱ्या ५६ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत खटाव तालुक्यात कार्यरत सर्वाधिक पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर पाटण तालुक्यातील तिघेजण तर सातारा कोरेगाव आणि जावळी तालुक्यात कार्यरत प्रत्येकी दोन, माण तालुक्यातील एक कर्मचारी कोरोनाने मृत्युमुखी पडला आहे.
चौकट :
कोरोनावर मात केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या तालुकानिहाय...
जिल्हा परिषदेच्या ७६९ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यामधील ७३७ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये कोरेगाव तालुक्यातील १२३ जणांचा समावेश आहे. तसेच सातारा तालुक्यातील १३३, पाटण ८०, कऱ्हाड १०९, महाबळेश्वर ३३, खटाव ६१, वाई ५६, फलटण ४६, खंडाळा ३७, जावळी २५ आणि माण तालुक्यात कार्यरत ३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
....................................................