सिद्धार्थ सरतापेवरकुटे-मलवडी : हिंदू धर्मातील महिलांसाठी ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पोर्णीमेला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संक्रमणाने वटपौर्णिमेलाही ग्रहण लागल्याने, ऐन वटपौर्णिमेच्या दरम्यान वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील कोरोना बाधित झालेल्या महिलांनी उपचार घेत असलेल्या संकल्प कोरोना सेंटरमध्येच वडाच्या वृक्षाची मनोभावे पुजा केली. स्वतः जीवघेण्या रोगाशी लढा देत असतानाही आपल्या पतीसाठी वरदान मागितले.ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या वटपौर्णिमेच्या सणाला वड या वृक्षाच्या पुजेला अनन्यसाधारण महत्व आहे. वड हा वृक्ष दिर्घायुष्य असणारा, डेरेदार सावलीचा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी उपवासाचे व्रत करुन मनोभावे वडाच्या झाडाची पूजा केल्यावर धन्याला जास्त आयुष्य मिळते, अशी धारणा या मागे आहे.
यंदा मात्र कोरोनाची काळी छाया वटपौर्णिमेच्या सणावर पडल्याने, कोरोनाने बाधित झालेल्या सुवासिनी महिला वटपौर्णिमेच्या पवित्र व्रतापासून आणि वटवृक्षाच्या पुजेविणा वंचित राहू नयेत, यासाठी संकल्प कोरोना सेंटरच्या निखिल बनसोडे, रंजीत चव्हाण, ललीत केंगार, कुंडलीक मंडले या स्वयंसेवकांनी आपलेपणाचा आधार देत आईच्या मायेच्या उबीने कोरोना सेंंटरच्या प्रांगणातच वटवृक्षाची मोठी फांदी लावून उपचार घेत असलेल्या सर्व सुहासिनी महिलांंसाठी वटवृक्षाच्या पुजेचे आयोजन करुन आपलेपणाचा आधार दिल्याने सर्वचस्तरातून स्वयंसेवकांचे कौतुक होत आहे.कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर उपचार घेणाऱ्या महिलांना आपण आजारी असल्याने, आपल्याला वटपौर्णिमेदिवशी वटवृक्षाची पूजाअर्चा करता येणार नाही. ही खंत त्यांच्या मनात राहू नये. सणाच्या निमित्ताने महिला रुग्णांचे समाधान व्हावे. यासाठी वटपौर्णिमा कोरोना सेंटरमध्येच साजरी करण्याचे नियोजन केल्याने सुवासिनी महिलांना खूप आनंद झाला.