जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना वाढ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:12 AM2021-02-18T05:12:07+5:302021-02-18T05:12:07+5:30
सातारा : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण वाढत असून मागील १५ दिवसांत तर ग्रामीण भागात प्रमाण अधिक आहे. यामध्ये ...
सातारा : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण वाढत असून मागील १५ दिवसांत तर ग्रामीण भागात प्रमाण अधिक आहे. यामध्ये खटाव तालुक्यातील वडूजला ३०, मांडवे येथे ३६ तर कोरेगाव तालुक्यात सासुर्वेत ४८ आणि माणमधील मार्डीत ६५ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या उत्तरार्धात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर हळू-हळू कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली. जून महिन्याच्या उत्तरार्धापासून तर कोरोना बाधितांची संख्या दिवसाला शेकडोच्या पटीत वाढली. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाचा कहर होता. दिवसांत कधी ६००, ७०० तर कधी ८०० च्यावर कोरोना बाधित आढळून आले. यामुळे सप्टेंबरअखेर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ३७ हजारांवर गेली. तसेच मृतांचाही आकडा वाढला. मात्र, ऑक्टोबर महिन्यानंतर कोरोना बाधितांचे प्रमाण कमी होत गेले.
जानेवारी महिन्यापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी होती. तसेच मृतांचाही आकडा कमी झाला. मात्र, फेब्रुवारी महिना उजाडताच कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. तसेच मृतांचाही आकडा वाढला आहे. अवघ्या १५ दिवसांत १ हजार ९५ नवीन रुग्ण वाढले. तर २० जणांचा बळी गेला आहे. विशेष म्हणजे शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्ण वाढीचे प्रमाण अधिक आहे.
मागील १५ दिवसांत खटाव तालुक्यातील वडूजमध्ये ३० रुग्ण वाढले तर मांडवेत ३६ नवीन रुग्ण स्पष्ट झाले. त्याचबरोबर कोरेगाव तालुक्यातील सासुर्वेत ४८, वाघजाईवाडीत ३२, कोरेगाव २२, रहिमतपुरात ७ रुग्ण आढळले. माण तालुक्यात मार्डी येथे आतापर्यंत ८० रुग्ण आढळून आले असून त्यामधील ६५ हे फेब्रुवारीत स्पष्ट झाले आहेत.
सातारा शहरातील सदरबझारमध्ये १४, कोडोलीत ७, खोजेवाडीत १९ तसेच खटाव तालुक्यात निमसोडला ९, नेर येथे १० रुग्ण वाढले. तर वाई ताुलक्यातील बावधनला ११, लोणंदला नवीन ८ रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात शहरीभागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर आता ग्रामीण भागातही कोरोनाची रुग्ण संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनापुढे चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासन लवकरच काही निर्णय घेण्याची शक्यता आहे.
चौकट :
१५ दिवसांत तालुकानिहाय आढळलेले रुग्ण...
सातारा २७०, खटाव २०४, कोरेगाव १७७, माण ११८, वाई ७०, फलटण ६९, खंडाळा ५४, कऱ्हाड ४०, जावळी ३३, महाबळेश्वर ३१, पाटण २१ आणि इतर जिल्ह्यातील १० असे मिळूण १ हजार ९७ रुग्ण आढळून आले आहेत.
...................................
कोट :
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, विशेषत: ग्रामीण भागातील काही गावांत याचे प्रमाण अधिक आढळून येत आहे. कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी शासन नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. तरच कोरोना नियंत्रणात येईल.
- डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी
....................................................