दरम्यान, बाधित आढळलेल्या व्यापाऱ्यांच्या कुटुंबीयांचीही कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एका व्यापाऱ्याच्या कुटुंबातील आणखी दोघे बाधित आढळून आले असून प्रशासनाने तो भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे.
कऱ्हाड शहरात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह प्रशासन कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मेहनत घेत आहे. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन चौकशी करण्यासह आजारी रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व स्टाफ संक्रमण थोपविण्यासाठी परिश्रम घेत आहे. शहरासह तालुक्यातही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने शहरातील भाजी विक्रेते, व्यावसायिक यांची पालिकेच्या वतीने कोरोना तपासणी घेण्यात आली. एकूण १२५ जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन व्यापाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यापाऱ्यांच्या कुटुंबातील सर्वांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एका व्यापाऱ्याच्या कुटुंबातील दोघे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने संबंधित विभागावर लक्ष केंद्रित करून बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू केला आहे.