काले आरोग्य केंद्रांतर्गत कोरोना लसीकरण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:41 AM2021-04-09T04:41:18+5:302021-04-09T04:41:18+5:30

काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५ उपकेंद्रे व मलकापूर शहरासह १४ गावे येतात. त्या गावांमधील ७८ हजार एवढी लोकसंख्या आहे. ...

Corona vaccination halted at Black Health Center | काले आरोग्य केंद्रांतर्गत कोरोना लसीकरण ठप्प

काले आरोग्य केंद्रांतर्गत कोरोना लसीकरण ठप्प

Next

काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५ उपकेंद्रे व मलकापूर शहरासह १४ गावे येतात. त्या गावांमधील ७८ हजार एवढी लोकसंख्या आहे. आरोग्य मंत्रालयाने लागू केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काले प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू केले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र यादव व डॉ. तबस्सुम कागदी यांच्या अचूक नियोजनानुसार व सर्व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मलकापूरसह इतर गावात नागरिकांना लस दिली जात आहे. १३ फेब्रुवारीला या आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणास सुरुवात झाली. आजअखेर मलकापुरातील ३०० नागरिकांसह दोन हजारजणांना कोव्हिशिल्ड व को-व्हॅक्सिन लस देण्यात आली आहे. गुरुवारी केंद्राकडे उपलब्ध असलेले १२० डोस दिल्यानंतर लसीकरण बंद करावे लागले. सर्व सोय असूनही लस उपलब्ध नसल्यामुळे काले येथून नोंदणीकृत शेकडो लोकांना लस न घेताच परत जावे लागले.

- चौकट

लस उपलब्ध होताच लसीकरण

काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मलकापूर शहरात दोन लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. इतर गावातही आठवड्यात वार ठरवून लस देण्याचे नियोजन केले आहे. मात्र, गुरुवारी लस संपली आहे. वरिष्ठ पातळीवरून पुरेशी लस उपलब्ध होताच पुन्हा लसीकरण मोहीम सुरू होईल, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र यादव व डॉ. तबस्सुम कागदी यांनी दिली.

Web Title: Corona vaccination halted at Black Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.