corona virus : सकारात्मक विचारांनी अण्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 05:19 PM2021-05-14T17:19:28+5:302021-05-14T17:28:24+5:30
corona virus : प्रचंड अफाट इच्छाशक्ती, हिंमत आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर जीवनातील अनेक संकटांवरदेखील मात करता येते. याचे मूर्तिमंत उदाहरण ठरले ते येथील शिवाजी शिक्षण मंडळाचे वय वर्षे नव्वदीतील अध्यक्ष दादासाहेब ऊर्फ अण्णा जोतिराम गोडसे हे होय. वडूज पंचक्रोशीतील वयोवृद्धांना आदर्श, तर युवक-युवतींना नेहमीच आरोग्याबाबत प्रेरणादायी ठरलेल्या अण्णांनी आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनोला चीतपट केले.
वडूज : प्रचंड अफाट इच्छाशक्ती, हिंमत आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर जीवनातील अनेक संकटांवरदेखील मात करता येते. याचे मूर्तिमंत उदाहरण ठरले ते येथील शिवाजी शिक्षण मंडळाचे वय वर्षे नव्वदीतील अध्यक्ष दादासाहेब ऊर्फ अण्णा जोतिराम गोडसे हे होय. वडूज पंचक्रोशीतील वयोवृद्धांना आदर्श, तर युवक-युवतींना नेहमीच आरोग्याबाबत प्रेरणादायी ठरलेल्या अण्णांनी आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनोला चीतपट केले.
धोतर, नेहरू शर्ट व गांधी टोपी परिधान केलेले जोतिराम गोडसे हे वडूज गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचे सातारा जिल्ह्यात सामाजिक, राजकीय व शैक्षणिक वलय मोठे आहे. ते यापूर्वी वडूजचे सरपंच, खटाव पंचायत समितीचे उपसभापती, सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सलग चौदा वर्षे संचालक राहिले आहेत.
महाराष्ट्रदिनी म्हणजे एक मे रोजी त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांची कातरखटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनो चाचणी करण्यात आली. त्या चाचणीत ते पॉझिटिव्ह आल्यामुळे अधिक तपासणीसाठी सातारा येथे गेले असता त्यांचा एचआरसीटी स्कोर आठ व ऑक्सिजन पातळी ८५ आल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी कऱ्हाड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; परंतु अशा आजारासह अनेक कटु प्रसंगांवर मात केलेले अण्णा हे खचून न जाता ते कोरोनोला धाडसाने सामोरे गेले.
सुरुवातीला त्यांना प्रचंड त्रास झाला. नातेवाईक गडबडून घाबरलेल्या मन:स्थितीत होते; परंतु ते मनाने खचले नाहीत. उलट नातेवाइकांना ह्यमला काही होणार नाहीह्ण असा धीर देत आणि कोरोनोशी दोन हात करीत इच्छाशक्तीच्या जोरावर उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला. यादरम्यान त्यांचे भाचे संजय गरुड यांनी अण्णांचे मनोबल वाढविले.
अण्णा ठणठणीत बरे झाल्यानंतर ते लाडक्या भाच्यासोबत रुग्णालयातून बाहेर पडले. या काळात त्यांची सेवा केलेले वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व वॉर्ड बॉय यांची प्रत्यक्ष गाठ घेऊन धन्यवाद देण्यासही ते विसरले नाहीत. कोरोनोला हरवून त्यांनी दाखवून दिले की, हिंमत कायम ठेवून, मनाच्या सकारात्मकतेमुळे आपण कोरोनोला हरवू शकतो. कोरोनो हा जीवघेणा आजार नाही, सकारात्मक राहा तुम्हीदेखील कोरोनोला हरवू शकता, हा संदेशच त्यांनी यानिमित्ताने दिला आहे.
न घाबरता कोणत्याही संकटाला सामोरे गेले तर यश हे निश्चित आहे. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी दैनंदिन व्यायाम, सकस आहार आणि प्रत्येक ऋतूतील फळांचा आस्वाद घेणे आवश्यक आहे. मी या जीवघेण्या आजारावर मात केली आहे. हा आजार आपल्याला शिवणारही नाही, यासाठी शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा आणि महत्त्वाचे लसीकरण करून घ्या.
-दादासाहेब गोडसे ऊर्फ अण्णा