अनेक संकटांचा सामना केलाय कोरोनाही दूर होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:39 AM2021-05-14T04:39:40+5:302021-05-14T04:39:40+5:30
दहिवडी : ‘कोरोनाच्या लाटा येत आहेत. यापुढेही येत राहतील त्याला घाबरण्याचे काही कारण नाही. यापूर्वीही अनेक वेळा संकटाचा सामना ...
दहिवडी : ‘कोरोनाच्या लाटा येत आहेत. यापुढेही येत राहतील त्याला घाबरण्याचे काही कारण नाही. यापूर्वीही अनेक वेळा संकटाचा सामना केला आहे. हे संकटही दूर होईल. मात्र, या काळात गरज पडल्यास गोंदवलेकर ट्रस्टने मोठी जबाबदारी उचलावी. आमची गोंदवले म्हसवडची शाळेची जागा कोरोनासाठी वापरण्यास देऊ,’ असे आश्वासन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले.
गोंदवले बुद्रुक येथे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी विविध ट्रस्ट सेवाभावी संस्था, गोंदवले ग्रामस्थ, प्रशासन यांच्या मदतीने सुरू केलेल्या कोरोना सेंटरच्या उदघाटनानंतर पत्रकाराशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी
गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, संदीप मांडवे, मनोज पोळ, सोनाली पोळ, तानाजी कट्टे, बाळासाहेब माने, तेजस शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर, सुनील पोळ, बाळासाहेब सावंत, कविता म्हेत्रे, सुभाष नरळे, अंगराज कट्टे, संजय माने, अभय जगताप, युवराज सूर्यवंशी, अमोल काटकर, रमेश पाटोळे, नितीन राजगे, तानाजी कट्टे, राहुल मंगरुळे, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, ‘ग्रामीण भागात जास्त पेशंट वाढत आहेत. त्या ठिकाणी आयसोलेशनची सुविधा नाही. दोन खोल्यांमध्ये आयसोलेशन कसे होणार? याकडे लक्ष दिले पाहिजे. राजकारणविरहीत या संकटाचा सामना करावा लागेल.’
पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘संपूर्ण देशात ऑक्सिजनचा तुटवडा होता. त्यामुळे राज्यातही त्याचा परिणाम झाला. फक्त कोरोना सेंटर उभारून चालणार नाहीत तर सुविधा पुरावाव्या लागतील. यासाठी आपण टप्प्या-टप्प्याने कोरोना सेंटर उभे करत आहोत. पॉझिटिव्ह रेट कमी झाला तरी गाफिल राहू नका. शासनाच्या नियमांचे पालन करा. तालुक्यात बाधित रुग्ण वाढत आहेत. त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी सहकार्य करावे.’
प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘या ठिकाणी ऑक्सिजनचे तीस बेड, शंभर आयसोलेशन बेडची सुविधा आहे. माणमध्ये १६०० खटावमध्ये १७०० पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत तर अडीचशे रुग्णांची सोय होईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सुमारे तेराशे पेशंट घरीच आयसोलेशनवर आहेत. नरवणेत ३६ लोकांचा मृत्यू झाला. साताऱ्यातील जम्बो कोरोना सेंटर सुरू झाले आहे. मात्र, तेथे माण, खटाव, फलटण तालुक्यातील लोकांना प्रवेश मिळत नाही. या तीन तालुक्यांसाठी कुठेही शासनाने जम्बो कोविड सेंटर सुरू करावे. यावेळी ट्रस्ट सेवाभावी संस्था ग्रामस्थ यांनी सहकार्य केल्याबद्दल ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
माण पंचायत समितीतर्फे २० लाखांचा धनादेश देण्यात आला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे ऑनलाईन सहभागी झाल्या. अंगराज कट्टे यांनी मनोगत व्यक्त केले. अमोल काटकर यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो १३गोंदवले
गोंदवले येथे कोविड सेंटरचे उद्घाटन रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, प्रभाकर देशमुख उपस्थित होते. (छाया : नवनाथ जगदाळे)