मायणी : ‘राज्यात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून, ग्रामीण भागातही शेकडो रुग्ण आढळू लागले आहेत. जिथे गरज आहे तेथे कोविड केअर सेंटर उभे केले जाईल. रुग्णांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा प्राधान्याने पुरविल्या जातील,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी केले.
पडळ (ता. खटाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर प्रारंभ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते व जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती कल्पना खाडे, पंचायत समिती सभापती जयश्री कदम, प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी इनुस शेख, माजी सभापती संदीप मांडवे, मार्केट कमिटीचे माजी सभापती रवींद्र सानप, सरपंच मनीषा सानप, डॉ. सुशील तुरुकमाने आदी उपस्थित होते.
विधाते म्हणाले, ‘ग्रामीण भागामध्ये कोरोनाची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त ठिकाणी कोविड सेंटर उभे करून त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील. आज पडळ येथे तातडीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाण्याची सोय करण्यात आली.’
गुदगे म्हणाले, ‘या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ७० बेडची व्यवस्था आहे. सध्या या ठिकाणी २० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. लवकरच या ठिकाणी ऑक्सिजनयुक्त तीस बेड सुरू केले जाणार आहेत. प्रशासनाने याकामी गती घेतली आहे. जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यात व्हेंटिलेटर कक्ष सुरू करावेत, त्यामुळे जिल्हा सिव्हिल रुग्णालयावर रुग्णांचा पडत असलेला अतिरिक्त ताण कमी होईल.’
(चौकट)
उपोषणाच्या इशारानंतर कोविड केंद्र...
खटाव तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने पडळ येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाच्या इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर तातडीने हालचाली होऊन चार दिवसांतच पडळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीमध्ये शासकीय कोविड केअर सेंटर झाले.
२३पडळ
पडळ, ता. खटाव येथे कोविड केअर सेंटरचा प्रारंभ करताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे व मान्यवर उपस्थित होते. (छाया : संदीप कुंभार)