सातारा : कोरोना महामारीत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्यानंतरही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा तालुक्यातील चार हॉटेलचालकांवर सातारा तालुका पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाढे, म्हसवे गावांच्या हद्दीत तीन हॉटेल तर सैदापूर हद्दीतील एक हॉटेलचा समावेश आहे. याबाबतच्या सर्व तक्रारी कॉन्स्टेबल महेंद्र नारनवर यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
सातारा शहरालगत असणाऱ्या सैदापूर हद्दीतील मोळाचा ओढा परिसरात असणारे हॉटेल निकी बंटस चालू ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आकाश हरी कुलकर्णी (वय ४४, रा. सैदापूर, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल वैभव सावंत यांनी हा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हवालदार कदम करत आहेत. दरम्यान, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर म्हसवे गावच्या हद्दीत निश्चित वेळेपेक्षा अधिक वेळ हॉटेल सारंग सुरू ठेवल्याप्रकरणी संजय अंकुश फडतरे (वय ५४, रा. गोवे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कदम करत आहेत.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाढे हद्दीत पूजा पेट्रोलपंपासमोर हॉटेल शाही फोडणी सुरू ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दीपाली सोमनाथ अरगडे (वय ४०, रा. चंदननगर, जनाई-मळाई रोड, कोडोली, सातारा) तर हॉटेल साई सुरू ठेवल्याप्रकरणी संतोष दिलीप कांबळे (वय ३५, रा. रविवार पेठ, मार्केट यार्ड सातारा) आणि हॉटेल हिरकणी सुरू ठेवल्याप्रकरणी सुरज अरुण यादव (वय २८, रा. करंजे, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीनही गुन्ह्यांचा तपास हवालदार तोरडमल करत आहेत. अधिक तपास हवालदार तोरडमल करत आहेत.