वाईतील गर्ल्स हायस्कूल पाडल्याप्रकरणी ब्राह्मण समाजाच्या अध्यक्ष, सचिवांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:14 AM2021-02-21T05:14:15+5:302021-02-21T05:14:15+5:30
वाई : येथील रविवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या गर्ल्स हायस्कूलची इमारत पाडल्याप्रकरणी ब्राह्मण समाजाच्या अध्यक्ष मीनल राजेंद्र ...
वाई : येथील रविवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या गर्ल्स हायस्कूलची इमारत पाडल्याप्रकरणी ब्राह्मण समाजाच्या अध्यक्ष मीनल राजेंद्र साबळे व सचिव राजेंद्र सर्जेराव साबळे यांच्यावर वाई पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रेखा ठोंबरे यांनी याविषयीची फिर्याद दिली आहे. वाई रविवार पेठ येथे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे गर्ल्स हायस्कूल आहे. या शाळेच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून मीनल राजेंद्र साबळे (वय ४५), राजेंद्र साबळे (वय ५२, दोघे रा. रिमझिम बंगला, पोवई नाका, सातारा) यांनी संगनमताने दरोडा टाकून शाळेतील दहा संगणक, एक प्रिंटर, महत्त्वाची कागदपत्रं, शाळेचे रेकॉर्ड, विद्यार्थ्यांची कागदपत्रे, रजिस्टर, लाकडी टेबल-खुर्च्या असा १ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
मुख्याध्यापक रेखा ठोंबरे यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार त्यांनी वाई न्यायालयात दिनांक १७ फेब्रुवारी रोजी दाखल केली. त्यावरून वाई पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा तपास वाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे करत आहेत.
चाैकट : संस्था कायदेशीर लढा लढणार - अभयकुमार साळुंखे
ही संस्था समाजातील सर्वसामान्य घटकांना शिक्षण देऊन सक्षम करण्याचे काम गेली अनेक दशके करत आहे. ब्राह्मण समाज संस्थेने केलेले कृत्य योग्य नसून, संस्था कायदेशीर लढा लढणार आहे. या लढ्यात संस्थेला वाईमधील सामाजिक संस्था व नागरिकांनी साथ द्यावी, असे आवाहन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी केले. कार्याध्यक्ष साळुंखे यांनी शनिवारी वाईमध्ये येऊन पडलेल्या शाळेची पाहणी केली, यावेळी ते बोलत होेते.
यावेळी संस्थेचे सहसचिव डॉ. राजेंद्र शेजवळ, मुख्याध्यापिका रेखा ठोंबरे, डॉ. नितीन कदम, गिरीष गायकवाड, राजकुमार बिरामने, अशोकराव सरकाळे, उषा ढवण उपस्थित होते.