जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातजणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:39 AM2021-04-25T04:39:16+5:302021-04-25T04:39:16+5:30
सातारा : कोरोना महामारीत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. या कायद्यांतर्गत विविध प्रकारच्या आस्थापना सुरू करण्यास बंदी घातली ...
सातारा : कोरोना महामारीत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. या कायद्यांतर्गत विविध प्रकारच्या आस्थापना सुरू करण्यास बंदी घातली आहे. मात्र, सातारा शहर आणि परिसरात काही ठिकाणी त्याचे उल्लंघन होत असल्याने सातारा शहर पोलिसांनी चौघांवर कारवाई करून गुन्हा दाखल केला.
सातारा येथील गोडोली परिसरातील मोरे विहिरीजवळ काही तरुण हे मोकळ्या मैदानावर खेळत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहर पोलिसांनी पाहणी केली असता, प्रसाद निकम, प्रीतम बनकर, ओंकार सांळुखे, प्रथमेश भागवत हे तरुण मोकळ्या जागेत दुचाकी पार्क करून मैदानात खेळत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर सातारा शहर पोलीस ठण्यातील कॉन्स्टेबल भरत लावंड यांनी चौघांवर गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे करत आहेत.
दुसऱ्या घटनेत सातारा बसस्थानकामागे रूबी क्लिनिकजवळ पारंगे चौकात आरमान वडा पाव सेंटर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी खात्री करून वडा पाव सेंटरचा मालक नियाज दस्तगीर शिकलगार (रा. वाडे फाटा, सातारा) याच्याविरोधात कारवाई केली. कॉन्स्टेबल मंगेश सोनावणे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार असून, अधिक तपास पोलीस हवालदार भिसे हे करत आहेत.
शाहूपुरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत पंचपाळी कमानी हौद येथे सुरू असलेल्या नीलम मसाला व ड्रायफ्रुट्स या दुकानाचे मालक राहुल बाळासो पवार (रा. यवतेश्वर, ता.सातारा) तसेच याच परिसरातील एशियन पेंट्स या दुकानाचे मालक संतोष जाधव (रा. अंबवडे, ता. सातारा) या दोघांवर दुकाने सुरू ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.