साता-यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजेविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 08:22 AM2017-10-06T08:22:37+5:302017-10-06T10:32:56+5:30
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या 'सुरुची' बंगल्याजवळ झालेल्या मध्यरात्रीच्या धुमश्चक्रीनंतर शुक्रवारी सकाळी दोन्ही राजेंच्या गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनीही स्वतः पुढाकार घेऊन या दोन्ही गटांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाची स्वतंत्र फिर्याद दाखल केली असून परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री झालेला गोळीबार पोलिसांनी केला नाही, असे सांगितले गेल्यामुळे आता हा गोळीबार नेमका कुणाच्या कार्यकर्त्याने केला, याचा शोध सुरू झाला आहे.
सातारा - आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या 'सुरुची' बंगल्याजवळ झालेल्या मध्यरात्रीच्या धुमश्चक्रीनंतर शुक्रवारी(6 ऑक्टोबर) सकाळी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजेंच्या गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनीही स्वतः पुढाकार घेऊन या दोन्ही गटांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाची स्वतंत्र फिर्याद दाखल केली असून परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री झालेला गोळीबार पोलिसांनी केला नाही, असे सांगितले गेल्यामुळे आता हा गोळीबार नेमका कुणाच्या कार्यकर्त्याने केला, याचा शोध सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, शाहूपुरीकडून येणारा रस्ताही पोलिसांनी बंद केला आहे. मध्यरात्रीच्या राड्यानंतर खासदार उदयनराजे शेकडो समर्थकांसह शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या ठिकाणी पोलीस अधीक्षक संदीप पाटील व इतर पोलीस अधिकारी यांच्यासोबत सुमारे एक तासभर उदयनराजेंची चर्चा झाली.
त्यानंतर उदयनराजे गटाच्या समर्थकांची फिर्याद नोंदवून घेऊन शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे पाठवून देण्यात आली. उदयनराजे गटातर्फे अजिंक्य मोहिते यांनी ही फिर्याद दिली. दरम्यान, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटातर्फेही विक्रम पवार यांनी उदयनराजे गटाविरुद्ध गुन्हा दाखल केला. एकमेकांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या दोन्ही फिर्यादीत उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोघांचीही नावे आहेत. सध्या 'सुरुची' बंगल्याजवळ प्रचंड पोलीस बंदोबस्त असला तरी या भागात अजूनही तणावाचे वातावरण आहे.
या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली असली तरी या ठिकाणी पडलेला काचांचा सडा पाहण्यासाठी सर्वसामान्य नागरिक घाबरून डोकावत होते. दरम्यान, मध्यरात्रीच्या धुमश्चक्रीत जखमी झालेले पोलीस अधिकारी किशोर धुमाळ यांच्यावर उपचार करण्यात आले. अशा अवस्थेतही धुमाळ हे शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूच्या फिर्यादी दाखल करून घेण्यात मग्न होते. दरम्यान रात्री घटनास्थळी गोळीबाराच्या फैरी पोलिसांनी झाडलेल्या नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या ठिकाणी नेमका कोणत्या कार्यकर्त्यांने गोळीबार केला, याचाही शोध सुरू झाला आहे.