सातारा : डीजे सिस्टीमच्या वापरावर उच्च न्यायालयाने बंदी घातली असताना साताऱ्यात दहिहंडी उत्सवामध्ये दोन मंडळांनी डीजे सिस्टीमचा वापर केला. हा प्रकार शाहूपुरी पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन दोन सिस्टीम जप्त केल्या.करंजे येथील नवभारत गणेशोत्सव मंडळ आणि शनिमारूती मंदिर बसाप्पा पेठ येथे दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी डीजे लावण्यात आला असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ आपल्या कर्मचाऱ्यांसह तेथे धाव घेतली.
डीजे सिस्टीम तातडीने बंद करून जप्त करण्यात आली. करंजे येथील डीजे सिस्टीमप्रकरण अमर चंद्रकांत निकम (वय २५, रा. करंजे पेठ, सातारा) तर बसाप्पा पेठेतील डीजे सिस्टीमप्रकरणी युवराज विकास शिंदे (रा. शिंदेमळा, करंजे पेठ, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.