म्हसवड : अतिवृष्टीमुळे बळीराजाचे शेतातील पीक व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. माण तालुक्यातील देवापूर, पळसावडे व जांभुळणी येथील डाळींब, द्राक्ष व कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.गत आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुुळे दुष्काळी माण तालुक्यातील पूर्व भागाला मोठा फटका बसला. या पावसात माण तालुक्यातील बळीराजाची हातातोंडाशी आलेली पिके उध्वस्त झाली तर फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. त्या नुकसानीची कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सोमवारी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.
देवापूर व पळसावडे परिसरातील फळबागा पावसाने उध्वस्त झाल्या आहेत. कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहे. या पिकांची राज्यमंत्री कदम यांनी पाहणी करतानाच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या.गेल्या चार वर्षांपासून दुष्काळग्रस्त असणाऱ्या माण तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांना केली. मंत्री कदम यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार चंद्रकांत सानप यांना केल्या.यावेळी महाराष्ट्र कॉँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलासराव ओताडे, सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. विजय जाधव, काँग्रेस सेवादल सातारा जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पिसाळ, दादासाहेब काळे, विजय धट, प्रा. विश्वंभर बाबर, भीमराव काळेल, विकास गोजारी, बाबासाहेब माने, अनिल लोखंडे आदी उपस्थित होते.