रस्त्याच्या कामामुळे शेतीसह घरांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:26 AM2021-06-19T04:26:16+5:302021-06-19T04:26:16+5:30
कुडाळ : जावलीत मेढा-सातारा-महाबळेश्वर या रस्त्याचे काम सुरू आहे. गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने रस्त्याकडेला असलेल्या शेतीसह ...
कुडाळ : जावलीत मेढा-सातारा-महाबळेश्वर या रस्त्याचे काम सुरू आहे. गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने रस्त्याकडेला असलेल्या शेतीसह घरांचे नुकसान मोठे झाले आहे. यामुळे ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा फटका येथील जनतेला सोसावा लागत आहे.
या रस्त्यावरील मामुर्डी येथील पुलाच्या कामासाठी तयार केलेला पर्यायी रस्ता येथील शेतकऱ्यांसाठी घातक ठरला. या रस्त्यावरील भराव काही दिवसांपूर्वी वाहून गेला होता. त्यावेळीसुद्धा शेतीचे नुकसान झाले होते. त्यानंतर ठेकेदाराने ओबडधोबड भराव टाकून रस्ता सुरू करुन वाहतुक सुरळीत केली होती. मात्र सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या मोरीतून पाणी निघून न गेल्याने हे पाणी रस्त्यावरून वाहून गेले. पाण्याचा वेग एवढा होता की यामध्ये शेतीही पाण्याबरोबर वाहून गेली तर शेतातील विहिरी गाळाने भरल्या, असे मामुर्डीचे शेतकरी श्रीकांत धनावडे यांनी सांगितले.
याच मार्गावर सावली या ठिकाणी रस्त्याकडेला नाले नसल्याने पावसाचे पाणी घरात जाऊन घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. ठेकेदाराच्या कारभाराने येथील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला असून, नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ व शेतकरी करीत आहेत.
फोटो : १८ कुडाळ
ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे मामुर्डी ता. जावली येथील पाण्याचा लोट शेतात घुसून शेतीचे मोठे नुकसान झाले. (छाया : विशाल जमदाडे)
===Photopath===
180621\polish_20210618_184203037.jpg
===Caption===
पाण्याने शेतीचे नुकसान