करंजेत विद्युत वाहिनी ठरतेय धोकादायक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:41 AM2021-05-11T04:41:01+5:302021-05-11T04:41:01+5:30
करंजे : करंजे गावातील महावितरणच्या उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली आहे, त्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांना याचा धोका वाढला आहे. ...
करंजे : करंजे गावातील महावितरणच्या उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली आहे, त्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांना याचा धोका वाढला आहे. तरी महावितरणने याकडे लक्ष देऊन धोकादायक ठरणाऱ्या विद्युत वाहिनीची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
करंजे गावातील बऱ्याच ठिकाणी महावितरणच्या विद्युत वाहिन्या या घरांच्या अतिशय कमी अंतरावर आहेत. घरातील गच्चीतून एखाद्या व्यक्तीने किंवा लहान मुलांनी खेळताना जरी चुकून हात बाहेर काढला तर या विद्युत वहिनीला स्पर्श होऊन मोठा अनर्थ घडू शकते. त्यामुळे याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे बनले आहे. गावातीलच शेटे वाडा येथील खांबावरील उच्च दाबाची विद्युत वाहिनी अक्षरशः जमिनीपासून केवळ दहा ते बारा फूट अंतरावर लोंबकळत आहे. ही विद्युत वाहिनी घराच्या जवळून गेली आहे. त्यामुळे एखाद्या अघटित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यापूर्वी अनेक याठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. या परिसरात लहान मुले खेळता-खेळता घराच्या गच्चीवर जात असतात. अनेकवेळा खेळताना त्यांच्या हातातील खेळणीचा या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा धक्काही बसला आहे. अनेकावेळा संबंधित विभागाला याबाबत माहिती दिली असता अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून या बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
चौकट..
पाईप टाकण्याची गरज..
करंजेत अनेक घराशेजारून उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली आहे. तरी लोंबकळत असणाऱ्या विद्युत तारांना तात्पुरत्या स्वरूपात पाईप बसवावेत आणि धोकादायक ठरत असलेल्या वाहिन्यांची दुरुस्ती करावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे. शहरात अनेक ठिकाणी भूअंतर्गत वाहिनी कामे झाली आहेत. त्यामुळे अशाच प्रकारे करंजे परिसरात व्हावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
१०करंजे
करंजे (ता. सातारा) येथे उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेल्याने अनेकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. (छाया : किरण दळवी)