'दशरथ नंदना.. बाळा जो जो रेच्या पाळणा गीतांनी रामनवमी साजरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 10:28 PM2018-03-25T22:28:21+5:302018-03-25T22:28:21+5:30
दशरथ नंदना... बाळा... जो जो रे यासारख्या पारंपरिक पाळणा गीतांनी जिल्ह्यात उत्साहात रामनवमी सोहळा साजरा झाला. चाफळ येथील तीर्थक्षेत्र श्रीराम मंदिरात गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत रामनवमी उत्सव साजरा केला.
सातारा/चाफळ : दशरथ नंदना... बाळा... जो जो रे यासारख्या पारंपरिक पाळणा गीतांनी जिल्ह्यात उत्साहात रामनवमी सोहळा साजरा झाला. चाफळ येथील तीर्थक्षेत्र श्रीराम मंदिरात गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत रामनवमी उत्सव साजरा केला. फलटण येथेही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
सातारा शहरातील विविध राममंदिरांत हा सोहळा झाला. येथील समर्थ मंदिर परिसरातील श्री दामले राममंदिरात वेदमूर्ती हरिरामशास्त्री जोशी यांनी जन्मकाळाचे वर्णन अतिशय भावपूर्ण वातावरणात सादर केले. त्यानंतर गुलाल व पुष्पांजली उधळत रामनामाचा गजर करण्यात आला. शहरातील काळाराममंदिर येथे राम यज्ञाची सांगता झाली. शहरातील प्रतापगंज पेठेतील गोराराम मंदिरात जन्मकाळानंतर पालखी सोहळा संपन्न झाला.
गेंडामाळ येथील श्रीरामध्यान मंदिर, शनिवार पेठेतील शहा राममंदिर, फुटका तलावानजीकचे माटे राममंदिर, खणआळीतील राम मंदिर, व्यंकटपुरातील दिवेकर राम मंदिर, तसेच संगम माहुलीतील पंचधातूच्या सुरेख मूर्ती असणा-या श्रीराम मंदिरात जन्मोत्सव साजरा केला. प्रतापगंज पेठेतील श्रीराम मंडळानेही सायंकाळी रामरथाची मिरवणूक काढली होती.
रामनामाची महती संपूर्ण जगाला पटवून देणाºया श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या गोंदवले बुद्रुक येथील थोरले श्री राम व धाकटे राममंदिरात भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सज्जनगडावर स्वत: रामदास स्वामींनी पूजन केलेल्या पंचधातूच्या राममूर्तींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
चाफळ येथील मंदिराच्या मुख्य गाभाºयात फुलांनी सजविलेला पाळणा बांधला होता. दुपारी साडेबाराच्या दरम्यान समर्थ वंशज गादीचे मानकरी भूषण स्वामींच्या हस्ते पाळण्यात प्रभू रामचंद्रांची प्रतिकृती (मूर्ती) ठेवल्यानंतर पाळणा गीत व ललिताचे कीर्तनासह राम नामाच्या जयघोषात श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी श्रीरामाच्या पाळण्यावर पृष्पवृष्टी करत गुलाल खोबºयाची उधळण केली.
रथाचे मानकरी दिलीप गंगाराम साळुंखे यांनी पाळण्याची दोरी सोडल्यानंतर पाळणा खाली घेऊन त्यातील मूर्ती समर्थ वंशजांच्या ओटीत घालण्यात आली. यानंतर उपस्थितांना सुंठवडा वाटप केला.