ओढ्यालगत आढळला मृत बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:59 AM2021-02-23T04:59:36+5:302021-02-23T04:59:36+5:30
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, धामणी गावच्या हद्दीत ढालांबी नावाचे शिवार आहे. या शिवारात बाजीराव दिनकर सावंत यांची शेतजमीन आहे. या ...
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, धामणी गावच्या हद्दीत ढालांबी नावाचे शिवार आहे. या शिवारात बाजीराव दिनकर सावंत यांची शेतजमीन आहे. या शेतजमिनीपासून ओढा गेला असून ओढ्यालगत बिबट्या मृतावस्थेत पडल्याचे सोमवारी दुपारी शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती तातडीने वन विभागाला दिली. त्यानंतर वन क्षेत्रपाल विलास काळे, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे सदस्य रोहन भाटे, वनपाल सुभाष राऊत, वनरक्षक अमृत पन्हाळे, जयवंत बेंद्रे, विलास डुबल, वनमजूर मुबारक मुल्ला, अजय कुंभार यांच्यासह वन अधिकारी व कर्मचारी तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी संबंधित मृत बिबट्याला झाडीतून बाहेर काढले. त्याची प्राथमिक तपासणी केली असता दात, नख्या तसेच इतर अवयव सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले.
धामणीचे माजी सरपंच संजय सावंत, नानासाहेब सावंत, हणमंत कुष्टे, बाजीराव सावंत यांच्या समक्ष वनाधिकाऱ्यांनी पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. संबंधित बिबट्या मादी जातीचा असून तो ५ ते ६ महिने वयाचा असावा, असा वनाधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
फोटो : २२केआरडी०७
कॅप्शन : धामणी (ता. पाटण) येथील शिवारात सोमवारी दुपारी मृत बिबट्या आढळून आला.