सातारा: प्रचंड उकाडा असल्यामुळे घराच्या छतावर झोपलेल्या वृद्धाचा छतावरून पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली.विष्णू कृष्णा कोळपे(वय ६३,रा.संगमनगर,गणेश कॉलनी सातारा) असे घराच्या छतावरून पडून मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सध्या उकाड्याने हैराण केल्यामुळे अनेकजण इमारतीचे टेरेस अथवा अंगणात झोपत असतात.
विष्णू कोळपेही घरात उकडत असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून घराच्या छतावर झोपेत होते. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास अचानक ते झोपेतून खाली पडले. त्यांच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली.
छतावर पडल्यामुळे मोठा आवाज झाला. त्यामुळे घरातील इतर लोक जागे झाले. कोळपे यांना जखमी अवस्थेत त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र,तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.