डोळ्यांदेखत ‘त्यांच्या’वर कोसळला मृत्यू!

By Admin | Published: September 10, 2014 10:51 PM2014-09-10T22:51:29+5:302014-09-11T00:09:44+5:30

आठवणींनी गहिवर : बोलता-बोलताच ‘यूजी’ आणि इतर दोघे ढिगाऱ्याखाली झाले लुप्त

The 'death' of them collapsed! | डोळ्यांदेखत ‘त्यांच्या’वर कोसळला मृत्यू!

डोळ्यांदेखत ‘त्यांच्या’वर कोसळला मृत्यू!

googlenewsNext

राजीव मुळ्ये - सातारा --सातारा : ‘एवढी फॅमिली घेऊन कशाला फिरताय? पाऊस पडतोय. पोरं भिजतील की...’ उमाकांत देशपांडे यांच्या तोंडातून एवढे शब्द बाहेर पडले आणि... त्यांच्यासह चार जणांवर भिंतीच्या रूपाने मृत्यू कोसळला. आयुष्यात प्रथमच मृत्युतांडव पाहून माधवी लाड यांना भोवळ आली.
बुधवारी सकाळी माधवी लाड जेव्हा आॅफीसला आल्या तेव्हा सहकाऱ्यांनी विचारलं, ‘काल दिसला नाहीत. कुठे होता?’ एवढ्या शब्दांनीही त्यांना पाहिलेला प्रसंग जसाच्या तसा आठवला आणि आॅफिसातच त्या ढसढसा रडू लागल्या. सहकाऱ्यांनी त्यांना शांत करून विचारल्यावर त्यांनी सोमवारी पाहिलेली घटना सांगितली.
माधवी लाड, त्यांच्या दोन मुली, भावजय आणि बहिणीचा मुलगा असे पाचजण विसर्जन मिरवणूक पाहायला बाहेर पडले होते. राजपथावर भलताच गोंगाट. डॉल्बीचा मोठा आवाज. पायाखालची जमीनसुद्धा हादरत होती आणि जीव घाबरा होत होता. रात्री सव्वादहा वाजून गेले असावेत. त्यांच्या कुटुंबीयांना भूक लागली. लाड यांना लगेच चंद्रकांत बोले आठवले. सध्या त्या आयुर्विमा महामंडळाच्या विभागीय कार्यालयात नोकरी करीत असल्या, तरी पूर्वी त्यांनी शहर शाखेत (क्र. ९४१) बरेच दिवस काम केलेलं. कॅन्टीनचा चहा घेऊन येणारे बोले आणि तिथल्या सर्व सहकाऱ्यांशी खेळीमेळीचे संबंध.
सिटी पोस्टाजवळ रस्त्यावरच त्यांनी कुटुंबीयांना थांबायला सांगितलं. बोले यांच्या वडापावच्या गाड्याजवळ त्या जाऊ लागल्या आणि समोरच गजानन कदम आणि ‘यूजी’ म्हणजे उमाकांत कुलकर्णी दिसले. विचारपूस करताना ‘यूजी’ मोठ्याने म्हणाले, ‘एवढ्या फॅमिलीला घेऊन कशाला बाहेर पडलात? पाऊस पडतोय. पोरं भिजतील...’ त्यांचे शब्द पूर्ण होण्यापूर्वीच मोठ्ठा आवाज झाला आणि पाहता पाहता बोले, कुलकर्णी आणि कदम मातीच्या ढिगाऱ्यात गायब झाले. भिंत कोसळताना दोन पावलं मागे सरकलेल्या लाड यांना हे दृश्य बघून भोवळ आली; पण त्यांनी स्वत:ला सावरलं.
पोराबाळांना घटनास्थळापासून दूर नेत, कुटुंबीयांना सावरत पुढे जात असतानाच त्यांना आॅफीसमधले मस्के वॉचमन भेटले. भिंत पडल्याची घटना त्यांना सांगत असताना लाड यांना भरून आलं होतं. काही वेळानं पुन्हा त्या घटनास्थळी आल्या तेव्हा बोलेंच्या पत्नी तिथं ओक्साबोक्शी रडत होत्या. मृतदेह बाहेर काढेपर्यंत लाड त्यांच्याजवळ उभ्या राहिल्या. हा प्रसंग लाड यांच्या डोळ््यांसमोर नाचत राहिला आणि मंगळवारी त्या आॅफिसलाही जाऊ शकल्या नाहीत. ‘डॉल्बी बंद झाली पाहिजे आणि बोलेंच्या कुटुंबाला मदत मिळाली पाहिजे,’ असं त्या वारंवार म्हणतात.

तरीही डॉल्बी सुरूच होती...
मिरवणुकीतील डॉल्बींचं वर्णन करताना लाड सांगतात, ‘सिटी पोस्टाजवळची डॉल्बी फारच विचित्र आणि मोठ्ठी होती. तिची रुंदी रस्ता व्यापणारी होती. शेकडो जण नाचत होते. भिंत कोसळली तरी त्यांना भान नव्हतं. पोलीस ओरडून सांगत होते, ते कुणाला ऐकूही जात नव्हतं. शेवटी पोलिसांनी माइकवरून सांगितलं, तेव्हा डॉल्बी बंद झाली.’

Web Title: The 'death' of them collapsed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.