कर्जाच्या करारावर सह्या करण्यास विरोधकांचा नकार
By admin | Published: October 14, 2015 10:02 PM2015-10-14T22:02:58+5:302015-10-15T00:25:00+5:30
कृष्णा कारखाना : संचालकांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर बुधवारी संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. हंगाम सुरू करण्यासाठी जिल्हा बँकेकडून मंजूर झालेल्या ४५ कोटींच्या पूर्व हंगामी अल्प मुदत कर्जाच्या करारावर सह्या करण्याचा विषय या बैठकीत घेण्यात आला. मात्र, विरोधी संस्थापक पॅनेलचे सहा संचालक या करारावर सह्या न करताच निघून गेले. संस्थापक पॅनेलच्या संचालकांचा हा आडमुठेपणा असून, त्यांनी कारखान्याप्रती असलेल्या अनास्थेचेच दर्शन घडविले असल्याचा आरोप सत्ताधारी सहकार पॅनेलच्या संचालकांनी केला आहे.
कृष्णा कारखानास्थळी झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश भोसले होते.
कारखान्यावर कर्जाचा डोंगर असल्यामुळे कारखान्याला कोणतीही बँक कारखान्यास कर्ज देण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत जिल्हा मध्यवर्ती बँकेने ४५ कोटींचे पूर्व हंगाम अल्पमुदत कर्ज उपलब्ध करून देण्यास अनुकूलता दर्शविली असून, यासाठी सर्व संचालकांकडून थकहमी घेतली जाते. याबाबत बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी विरोधी संस्थापक पॅनेलचे संचालक व माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्यासह त्यांच्या गटाच्या अन्य पाच संचालकांनी या थकहमी करारावर सही करण्यास नकार दर्शविला. दरम्यान, सत्ताधारी संचालकांनी मात्र सभासदांच्या हितासाठी या कर्जाची सर्व जबाबदारी घेत हंगाम वेळेवर सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.
केंद्र सरकारच्या धोरणानुसार ४० लाख मे. टन साखर निर्यात कोटा नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या अंतर्गत कृष्णा कारखान्याला २ लाख २ हजार ९५५ क्विंंटल साखर निर्यात करण्याबाबत मंजुरी मिळाली असून, या साखरेला जास्तीत जास्त दर मिळवून पारदर्शीपणे निर्यातप्रक्रिया राबविण्याचा संकल्प संचालक मंडळाने केला आहे. (प्रतिनिधी) ...
अॅथलेटिक ट्रॅक उभारणार !
क्रीडा धोरणानुसार कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या सध्याच्या नवीन इमारतीच्या पुढील बाजूस विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत असा आॅलिम्पिक दर्जाचा अॅथलेटिक ट्रॅक उभारण्यासाठी शासनाकडे अनुदान मागणी प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच याच ठिकाणी आॅलिम्पिक दर्जाचा स्वीमिंग पूल उभारण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.