अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:37 AM2021-03-19T04:37:50+5:302021-03-19T04:37:50+5:30
रामापूर : पाटण शहरात अनेक बेकायदा व्यवसाय वाढले आहेत. स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या अवैध व्यवसायांवर कारवाई ...
रामापूर : पाटण शहरात अनेक बेकायदा व्यवसाय वाढले आहेत. स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या अवैध व्यवसायांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजप प्रज्ञा आघाडीचे जिल्हा संयोजक फत्तेसिंह पाटणकर यांनी तहसीलदार योगेश्वर टोपे यांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, पाटण शहरात अनेक शैक्षणिक संस्था तसेच शासकीय कार्यालये, बँका आहेत. शहरात अनेक हॉटेल लॉज सुरू असून लॉजवर अनैतिक व्यवसाय सुरू आहेत. यातून तालुक्यातील सामाजिक वातावरण गढूळ बनले आहे. स्थानिक प्रशासनाचे याकडे सर्रासपणे दुर्लक्ष आहे. या व्यवसायांमुळे सध्याची तरुणाई अवैध व्यवसायांमध्ये गुरफटत आहे. या व्यवसायांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
समाजभूषण ग्रंथालयात पदाधिकाऱ्यांचा सत्कार
कऱ्हाड : विद्यानगर येथील समाजभूषण बाबूराव गोखले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सैदापूर ग्रामपंचायतीमधील सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच अनिल जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यवाह प्रा. सूर्यमाला जाधव यांनी ग्रंथालयाची आवश्यकता व मूल्य विशद करून ग्रंथालयातील अनेक त्रुटींचा ऊहापोह केला. उपस्थित मान्यवरांनी काही ठोस कार्यवाही करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. फत्तेसिंह जाधव यांनी ग्रंथालयातील अडचणींबाबत आवश्यक सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. दादाराम साळुंखे व उमेश नाथ यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथालयाच्या अध्यक्षा कांचन धर्मे यांनी आभार मानले.
मसूरच्या बिरूदेवाची यात्रा कोरोनामुळे रद्द
मसूर : पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाजाचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या मसूर येथील बिरोबा देवाची यात्रा शुक्रवार, १९ व शनिवार, २० मार्च रोजी होणार होती. मात्र, या वर्षी कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती बिरदेव यात्रा समितीच्या वतीने देण्यात आली. प्रतिवर्षी बिरोबा देवाची यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते. त्यानिमित्त येथे धनगर समाजासह इतर भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. तथापी या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शुक्रवार व शनिवार रोजी होणारे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
देसाई महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा
रामापूर : पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी महिलांना स्वातंत्र्य असावे की नसावे, हा विषय होता. स्पर्धेत सहा गटांतून एकूण २४ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण पी.डी. गायकवाड यांनी केले. महिला सबलीकरण समितीच्या निमंत्रक हेमलता काटे यांनी स्पर्धेचे नियम सांगितले. प्राचार्य डॉ. एन.डी. पवार यांनी आजचा दिवस हा महिलांचा नसावा तर येणारा प्रत्येक दिवस हा महिलांसाठी असावा, असे सांगितले.
वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये व्याख्यान
कऱ्हाड : येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ लेखक, कवी व समीक्षक डॉ. सहदेव चौगुले-शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील होते. प्राचार्य जाधव यांनी प्रास्ताविक केले. केंगार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. एस. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी मान्यवरांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले. एस. आर. सरोदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.