लॉकडाऊनमधून सलून व्यवसाय वगळण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:40 AM2021-04-09T04:40:47+5:302021-04-09T04:40:47+5:30
मसूर : महाराष्ट्र राज्य कराड उत्तर स्वाभिमानी नाभिक संघटना कराड उत्तर पदाधिकाऱ्यांच्या वतीने कराडचे तहसीलदार यांना निवेदन देऊन सलून ...
मसूर : महाराष्ट्र राज्य कराड उत्तर स्वाभिमानी नाभिक संघटना कराड उत्तर पदाधिकाऱ्यांच्या वतीने कराडचे तहसीलदार यांना निवेदन देऊन सलून व पार्लर हा व्यवसाय लॉकडाऊनमधून वगळून ३ ते ४ दिवसांत सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र स्वाभिमानी नाभिक संघटनेचे राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड व जिल्हाध्यक्ष अधिकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने हे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात महाराष्ट्रातील सलून व्यवसाय शासनाने दिलेल्या आदेशानुसार बंद ठेवण्यास शासनाला सहकार्य करण्यास तयार आहेत; परंतु शासनाने प्रत्येक कारागिरास त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी महिन्याला २५ ते ३० हजार रुपये द्यावेत. तसेच शासनाने महाराष्ट्रातील सर्व सलून कारागिरांना कोरोनाची लस घेण्याचा आदेश काढला असताना कारागिरांना लस दिली जात नाही. वयाचा निकष लावत सर्व कारागिरांना तातडीने लस देण्याचे आदेश काढावेत. या सर्व बाबींचा शासनाने ३ ते ४ दिवसांत शासनाने निर्णय घेऊन तातडीने आदेश काढावेत अन्यथा १२ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सर्व सलून व्यवसाय सुरू केले जातील. त्यानंतर सलून व्यावसायिकांना पोलीस खाते किंवा शासकीय त्रास झाल्यास महाराष्ट्रातील नाभिक सलून व्यावसायिक रस्त्यावर उतरून जेलभरो आंदोलन करतील. यास पूर्णपणे मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री, शासन जबाबदार असेल, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी कार्याध्यक्ष तात्यासाहेब चव्हाण, खजिनदार पोपट काशिद, कराड उत्तर विधानसभा उपाध्यक्ष गणेश कदम, कराड उत्तर तालुका उपाध्यक्ष संजय झेंडे यांची उपस्थिती होती.