खंबाटकीत नव्या बोगद्याऐवजी उड्डाणपूल उभारावा, खंडाळ्यातील शेतक-यांनी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 01:33 PM2017-11-26T13:33:10+5:302017-11-26T13:33:40+5:30
खंडाळा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर होऊ घातलेल्या खंबाटकी घाटातील दुस-या बोगद्याला खंडाळा, वाण्याची वाडी आणि वेळे या तिन्ही गावांतील शेतक-यांना विचारात न घेता महामार्ग प्राधिकरणाने नियोजित जागेची मोजणी सुरू करण्याचा घाट घातला आहे.
खंडाळा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर होऊ घातलेल्या खंबाटकी घाटातील दुस-या बोगद्याला खंडाळा, वाण्याची वाडी आणि वेळे या तिन्ही गावांतील शेतक-यांना विचारात न घेता महामार्ग प्राधिकरणाने नियोजित जागेची मोजणी सुरू करण्याचा घाट घातला आहे. विकासात्मक कामे झाली पाहिजेत; पण आमच्या घरावर नांगर फिरवून नका, जे काम करणारे आहेत, त्यांनी शेतक-यांना विश्वासात घेऊन रस्त्याऐवजी उड्डाणपुलाचा मार्ग अवलंबवावा, अशा प्रतिक्रिया शेतक-यांमधून व्यक्त होत आहे.
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत व्हावी, यासाठी खंबाटकी घाटातील बोगद्याशेजारी आणखी एक बोगदा प्रस्तावित करण्यात आला आहे. यासाठी येथील स्थानिक शेतक-यांच्या आणखी जमिनी जाणार असल्याने हा बोगदा शेतक-यांच्या मुळावरच बसणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
नवीन होणारा बोगदा व त्यानंतर दोन किलोमीटर लांबीचा रस्ता त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अंदाजे २१० फूट जागा सोडावी लागणार आहे. शेतक-यांच्या संमतीने ही जागा घेण्यात येणार असल्याचे एकीकडे सांगितले जात असताना शेतक-यांच्या उपरोक्ष जमीन मोजणीचा घाट घातला जात आहे. मात्र, यासाठी खंडाळा आणि वाण्याची वाडी येथील शेतक-यांची आणखी जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे. या अगोदर राष्ट्रीय महामार्ग तसेच धोम-बलकवडीच्या प्रकल्पासाठी स्थानिक शेतक-यांनी जागा देऊन योगदान दिले आहे. आता या रस्त्यासाठी जमिनी दिल्यास अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे आणखी किती वेळा जागा शासनाला द्यायच्या, असा प्रश्न शेतक-यांपुढे आहे.
नवीन प्रकल्पासाठी आणखी जमिनी घेतल्यास शेतकरी भूमिहीन होणार आहेत. जमीन मोजणीच्या नोटिसा शेतक-यांना दिलेल्या नाहीत. खासगी एजन्सीच शेतक-यांना भेटत आहे. त्यामुळे प्राधिकरणाची भूमिका संदिग्ध आहे. ८२ शेतकºयांच्या जमिनी जात असल्याने हे शेतकरी देशोधडीला लावून प्रकल्प उभारायला आमचा विरोध आहे. यापेक्षा नवीन बोगदा ते जुन्या टोलनाक्यापर्यंत उड्डाण पूल बनविल्यास जमिनी वाचतील व प्रकल्पाचा खर्चही वाचेल.
- शरदकुमार दोशी, नगराध्यक्ष खंडाळा