महाबळेश्वर : ‘देशात लोकशाही संपुष्टात येऊन हुकूमशाही सुरू झालीय. याबाबत कोणी आवाज उठवला तर त्याला धमक्या दिल्या जातात. ईडी, सीबीआय, रॉ यांचा ससेमिरा मागे लावला जातो. ईव्हीएममध्ये घोटाळा करून सत्तेवर आलेल्यांनी प्रत्येक लोकसभा मतदार संघात एक ते दीड लाख मतांची हेराफेरी केली आहे,’ असा खळबळजनक आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.
महाबळेश्वर येथे महाबळेश्वर मधोत्पादक सहकारी सोसायटीत सेंद्रीय मध उत्पादन व सभासद विमा संरक्षण प्रारंभ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब भिलारे, मधुसागरचे अध्यक्ष संजय गायकवाड, सभापती रुपाली राजपुरे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, माजी नगराध्यक्ष किसनराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार उदयनराजे म्हणाले, ‘स्थानिक भूमिपुत्रांनी कुठे दोन खोल्या बांधल्या की अधिकारी कायद्याचा बडगा दाखवून कारवाई करतात. परंतु सर्व कायदे धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करत विनापरवाना बंगले व हॉटेल बांधणाºया धनिकांना पालिका अधिकारी हे पायघड्या घालतात. अशा धनिकांविरोधात कोणी तक्रार केली तर बघू, करू, अशी उत्तरे दिली जातात. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांना झालंय तरी काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.’
यावेळी खादी ग्रामोद्योगचे संचालक डी. आर. पाटील, वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड, पंचायत समितीच्या उपसभापती अंजना कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्तात्रय वाडकर, रोहित ढेबे, माजी नगराध्यक्ष युसूफ शेख, माजी सभापती अॅड. संजय जंगम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबूराव सपकाळ, मनिष भंडारी, संजय उतेकर, सुभाष कारंडे, विशाल तोष्णीवाल, संजय पारठे, प्रशांत आखाडे, चंद्रकांत आखाडे, संदीप मोरे, बापू शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष संजय गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष अशोक भिलारे यांनी सूत्रसंचालन केले.
हरित लवादाचे भूत मानगुटीवर...गावठाण विस्तार, चटई क्षेत्रात वाढ, बेघरांची समस्या असे स्थानिकांचे अनेक प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. यामध्ये आता हरित लवादाचे भूत महाबळेश्वर तालुक्याच्या मानगुटीवर बसविण्यात आले आहे. हे सर्व प्रश्न एका वर्षाच्या आत मार्गी लावण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांच्याबरोबर प्रयत्न करणार आहे, असे सांगून उदयनराजे पुढे म्हणाले, ‘एका बाजूला पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी आपण प्रयत्न करीत असतो. शासन जाहिरात करीत असते. वाढलेल्या पर्यटकांच्या सोयीसाठी स्थानिकांनी काही केले तर लगेच त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो.’
महाबळेश्वर येथील कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले यांचा सत्कार आमदार मकरंद पाटील यांनी केला. यावेळी बाळासाहेब भिलारे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. (छाया : अजित जाधव)