व्हॉलिबॉलच्या मैदानावरून थेट देशसेवेसाठी रवाना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:17 AM2021-05-04T04:17:47+5:302021-05-04T04:17:47+5:30
मसूर : कऱ्हाड तालुक्यातील खराडेसारख्या ग्रामीण भागात सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या मयूर मोहन जाधव याने व्हॉलिबॉल खेळात देदीप्यमान कामगिरी करत ...
मसूर : कऱ्हाड तालुक्यातील खराडेसारख्या ग्रामीण भागात सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या मयूर मोहन जाधव याने व्हॉलिबॉल खेळात देदीप्यमान कामगिरी करत महाराष्ट्राच्या संघातून चमकदार खेळ करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मयूरची खेळाडू कोट्यातूनच बेळगाव येथील मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये भारतीय सैन्यदलात निवड झाली. मयूर सैन्यदलात रुजू होऊन देशसेवा करण्यासाठी जात असल्याने त्याच्या घरच्यांनाही आनंद झाला आहे.
खराडे, ता. कऱ्हाड येथे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या मयूरने प्राथमिक शिक्षण खराडे येथे तर दहावीपर्यंतचे शिक्षण यशवंतनगर येथे व अकरावी लालबहादूर शास्त्री कॉलेज सातारा येथे व बारावीचे शिक्षण बारामती येथील विद्याप्रतिष्ठान येथे घेतले. मयूरची दहावी झाल्यानंतर सातारा येथील शाहू क्रीडा संकुल येथे त्याने चुलते हणमंतराव जाधव व सातारा जिल्हा गुणवंत खेळाडू व आंतररराष्ट्रीय खेळाडू योगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने व्हॉलिबॉलचे धडे घेतले.
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मयूरने मध्यप्रदेश येथे झालेल्या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली होती.
मयूर जाधवने ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करत खेळाच्या माध्यमातून आपले उत्तम करिअर निर्माण केले. खेळामुळे आरोग्य सुदृढ राहते असे असले तरी त्यातून मुला-मुलींचे करिअर घडू शकते, हे दाखवून दिले.
मुला-मुलींना करिअरच्या नवनवीन वाटा दाखवल्यास ग्रामीण भागातूनही असे अनेक मयूर पुढे येतील. मयूरची सैन्यदलात निवड झाल्यावर त्याचे महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्रीनिवास पाटील यांनी व अनेक मान्यवरांनी देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
चौकोट
मयूरचे आजोबा दिवंगत जयसिंगराव जाधव हे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते. तसेच त्यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांनी समाजसेवा केली. मात्र, मयूरच्या माध्यमातून चौथी पिढी देशेसेवेत रुजू होत असल्याने आनंद व्यक्त होत आहे. आजही त्याचे चुलते हणमंतराव जाधव जिल्हा राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे अध्यक्ष आहेत तसेच गावात स्वामी समर्थ वाचनालयाच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत.
फोटो ०३जगन्नाथ कुंभार
खराडे येथील मयूर जाधवची खेळाडू कोठ्यातून सैन्यदलात निवड झाली आहे. (छाया : मयूर जाधव)