सातारा : जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची विभागीय आयुक्तमार्फत चौकशी करावी, अशी मागणी सातारा माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे व संघटनेमार्फत पाठपुरावा करावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष दीपक कांबळे व प्रदेशाध्यक्ष अमर बेंद्रे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यात जेव्हा पाहिजे तेव्हा जिल्हाधिकारी लॉकडाऊन घोषित करत आहेत. ऊठसूट गरिबांच्या मुळावर उठणे हे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना शोभत नाही. जिल्ह्यात एकाधिकारशाही सहन करत आहे जर तुम्हाला लॉकडाऊन लावायचे असेल तर सरसकट लावला पाहिजे होता.
कृष्णा कारखाना निवडणूक घेता, उद्घाटनाचे कार्यक्रम घेता, राजकीय मेळावा, मोर्चे, सभा, शासकीय उद्घाटने करता तेव्हा कुठे कोरोना जातो, कोरोना काय फक्त गोरगरीब जनतेमुळे होतो का, जिल्हाधिकाऱ्यांइतका गरिबांना लाखोंच्या पटीत पगार नाही, की शासनाच्या मोफत सुविधापण नाही. तुम्हाला जसे वीजबिल मोफत, वाहन मोफत, इतर सर्व सुविधा मोफत आहेत तसे सर्वसामान्य जनतेचे नाही. जेव्हा कष्ट करू तेव्हाच गरिबांची चूल पेटते तसेच सातारा जिल्हाधिकारी यांचे वागणे संशयास्पद आहे, कारण यामध्ये प्रचंड आर्थिक गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.