कातरखटाव : खटाव तालुक्याच्या पूर्व भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट बनलाय. उघड्या-बोडक्या डोगरावर दगडधोंड्याशिवाय काहीच नाही. डोंगर माळरानातील चारा वाळून गेल्यामुळं जनावरं धुळीच्या वाळवंटात हिरवा कोंब शोधत भटकतायत दिसभर. दुष्काळाची भीषणता माणसांबरोबरच जनावरांचीही परीक्षा घेऊ पाहतेय.श्रावणमासात डोंगर पठार हिरवेगार दिसते. परंतु पावसाचा पत्ता नसल्यामुळे थोडे फार उगवून आलेले गवत वाळून गेले आहे. गेल्या वर्षी रब्बी हंगाम पावसाअभावी पूर्ण वाया गेला. त्यामुळे जनावरांना चारा म्हणून वापर करण्यात येणाऱ्या कडब्याचे उत्पादनही कमी झाले आहे. मात्र आता पावसाने सुरू केलेला लपंडाव नागरिकांसह जनावरांसाठी जीवघेणा ठरत आहे. या भागात पाऊस न झाल्यामुळे पाण्याचीटंचाईचे सावट पसरू लागले आहे. शासन चारा छावनी सुरू करेल, या आशेवर शेतकरी आहेत. मात्र, चारा छावनीसंदर्भात शासन कोणताच ठोस निर्णय घेताना दिसत नाही. या भीषण दुष्काळी परिस्थितीत तग कसा धरायचा, या चिंतेने दुष्काळग्रस्त त्रासले आहेत. दुष्काळाची भीषणता ओळखून शेतक ऱ्यांना आर्थिक संकटातून वाचविण्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)गेंडामाळ ईदगाहमध्ये पावसासाठी नमाज...सातारा : सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी आज साताऱ्यातील गेंडामाळ ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले. निरागस बालके, पशु-पक्ष्यांवर तरी दया दाखवून पाऊस पाड व दुष्काळातून सर्वांना बाहेर काढ, अशी प्रार्थना करण्यात आली.पावसासाठी नमाज म्हणजेच ‘नमाज-ए-इसतिसका’ पैगंबरांच्या काळातही पावसाळ्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत होती. त्यावेळी पैगंबरही पावसासाठी नमाज पठण करून पावसासाठी प्रार्थना करीत होते. तिच परिस्थिती सध्या आपल्यावर आली असल्याने पैगंबरांनी पठण केलेल्या नमाजाचेच अनुकरण करून आजची नमाज पठण करण्यात आले. तळहात जमिनीकडे करून विशिष्ट प्रकारे परमेश्वराकडे पावसासाठी याचना करण्यात आली. यावेळी जिल्हाभरातून नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी) तीन दिवस नमाजपठण पावसासाठी नमाज-ए-इसतिसका’ ही सलग तीन दिवस होणार असून मंगळवार व बुधवारी सकाळी सात वाजता ईदगाह मैदान येथे जास्तीतजास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, तसेच आपल्यासोबत जनावरेही आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
जनावरं शोधतायत वाळवंटात हिरवा कोंब!
By admin | Published: August 31, 2015 8:18 PM