वसंत ऋतूतल्या कडक उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या घशाला ओलावा म्हणून शहरातील लोक वेगवेगळ्या फळांचा रस घेत असतात. हा रानमेवा खाल्ल्याने शरीरात तरतरी येऊन पुन्हा काम करण्यास उत्साह येत असतो. वसंत ऋतू संपून ग्रीष्म ऋतूचे आगमन झाले असतानाही यावर्षी कऱ्हाड, उंब्रज, मसूर यासारख्या लहान-मोठ्या बाजारपेठांत तोरणे, धामणे, आवळा, चिंचा, जांभळे हा रानमेवा दिसून आलाच नाही. हा रानमेवा व वनसंपदा नष्ट होण्यामागे वणव्याचे कारण आहे. एकंदरीत नेहमीच लागणाऱ्या वणव्यांकडे वन विभागाचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. हे वणवे वेळीच रोखले नाहीत तर भविष्यात पाटण तालुक्यातून रानमेवा नष्ट होईल, अशी भीती आहे.
या वणव्यांमुळे जंगलातील दुर्मीळ औषधी वनस्पतींसह पशू-पक्ष्यांची घरटी व घरट्यांमधील त्यांची अंडी, पिल्ले जळून जात आहेत. त्यामुळे पशू-पक्ष्यांचे अस्तित्वही संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, वन विभागाकडून जनजागृती करीत असताना हे वणवे का लागतात, ते रोखण्यासाठी त्यावर अधिक उपाययोजना काय केल्या पाहिजेत. याबाबत ठोस कारवाई होताना दिसत नाही.
- चौकट
वनौषधींसह फळझाडांवरही परिणाम
गत दोन ते तीन वर्षांपासून वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम डोंगररांगातून मिळणाऱ्या रानमेव्यांच्या झाडांवर झाला आहे. करवंदे, धामणे, तोरणे असा रानमेवा देणारी लहान झाडे वणव्यात जळून खाक होत आहेत. वणव्यांमुळे जांभूळ, चिंच, आवळा, आंबा या मोठ्या झाडांवरही परिणाम होऊन त्यांच्यापासून मिळणाऱ्या फळांचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. तसेच अनेक वनौषधी झाडे या वणव्यांमुळे नष्ट होत आहेत.