सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, कृष्णा कारखाना व किसनवीर सहकारी साखर कारखान्यासह जिल्ह्यातील १०५ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला. १५ फेब्रुवारीपासून निवडणूक घेण्याचा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने काढला आहे.
सहकारातील निवडणुकांचा बिगुल वाजल्याने राजकीय क्षेत्रात लगीनघाईला सुरुवात झालेली आहे. राज्यावर आलेली नैसर्गिक आपत्ती विचारात घेता कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका दि. १८ मार्च २०२० रोजीच्या आदेशान्वये १७ जून २०२० पर्यंत पुढे ढकलल्या होत्या. तथापि, कोरोनाचे सावट कायम राहिल्याने दि. १७ जून रोजी पुन्हा आदेश काढून निवडणुका दि. १६ सप्टेंबर २०२० पर्यंत तसेच दि. २८ सप्टेंबर २०२० ला आदेश काढून दि. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यानंतर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर दि. ३१ मार्च २0२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
दरम्यान, डिसेंबरमध्ये राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर लोकप्रतिनिधी व सहकारी संस्थांची निवडणूकप्रक्रिया सुरू करण्याची विनंती सहकार विभागाकडे केली आहे. याचा विचार करून राज्य शासनाने दि. १६ जानेवारी २०२१ रोजीचे आदेश रद्द करून ज्या टप्प्यावर सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या होत्या, त्या टप्प्यापासून कोविड-१९ च्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन सहकार संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत.
चौकट..
कोविडबाबत काळजी घ्यावी लागणार
प्रथम टप्प्यातील संस्थांची निवडणूक प्रक्रिया १५ फेब्रुवारीपासून सुरू करावी. त्याचबरोबर जिल्हा निवडणूक आराखड्यातील प्रथम टप्प्यातील सर्व सहकारी संस्थांची निवडणूक मुदतीत पूर्ण करावी. निवडणुकीवेळी सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझेशन, थर्मल स्कॅनिंग करणे बंधनकारक राहणार आहे. जिल्हा निवडणूक आराखड्यातील दोन ते सहा टप्प्यातील निवडणुकीस पात्र संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासाठी स्वतंत्र आदेश काढले जातील. निवडणुकीसाठी शासनाच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. निवडणुकीच्या दृष्टीने नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत निवडणुकीस पात्र संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा स्वतंत्र जाहीर करण्यात येणार आहेत.
कोट...
सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी सहकारी सोसायट्यांनी यापूर्वी जे ठराव दिले आहेत तेच कायम करण्यात येणार आहेत. तसेच जिथे प्रक्रिया थांबली होती, तिथून पुढे ती राबविली जाणार आहे.
- प्रशांत अष्टेकर, जिल्हा उपनिबंधक