कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:39 AM2021-07-28T04:39:46+5:302021-07-28T04:39:46+5:30
किडगाव : ‘गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या कोसळधार पावसाने किडगाव आणि कण्हेर परिसरात उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला ...
किडगाव : ‘गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या कोसळधार पावसाने किडगाव आणि कण्हेर परिसरात उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, कण्हेर धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अद्यापही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने किडगाव - हमदाबाज पूल अद्यापही पाण्याखालीच आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
महिन्याभरापासून पावसाने दडी मारली होती. मात्र, शुक्रवारपासून या परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे कण्हेर धरण ओव्हरफ्लो झाले असून, धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या चारही दरवाजांतून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात असल्याने वेण्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक गावांमधील स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत. रविवारपासून या परिसरात पावसाने उसंत दिली असून, दिवसभरामध्ये पावसाची उघडझाप होत होती. मात्र, रात्री दहानंतर पहाटे पाच वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडला.
दिवसा पावसाने उघडीप दिल्याने जनावरांना चारा आणणे व शेतातील काही किरकोळ कामे शेतकऱ्यांनी केली. कण्हेर धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. धरण ७५ टक्के भरले असून, गतवर्षी याचदिवशी धरण फक्त ४५ टक्के भरले होते. यावर्षी धरण लवकर भरल्याने शेतकऱ्यांचे चेहरे आनंदले आहेत तर पावसाने उघडीप दिल्याने घेवडा आणि भुईमूग पिकांना आधार मिळणार आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास काही पिके धोक्यात येऊ शकतात. जोरदार वाऱ्यामुळे ऊसाची शेती भुईसपाट झाली आहे.
Template
Image Attachment
Photo Manager
Social Media
Metadata
Attach Document
Translate
Backup
Agency
QrCode
Attch Audio/Video