खंडाळा : पुणे-सातारा आशियाई महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम होत असल्याने अपघातांची संख्या घटण्याबरोबरच वाहतुकीच्या समस्यांना आळा बसला आहे. मात्र काही ठिकाणी रुंदीकरणाचे काम ठप्प असल्याने अशा जागी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. विशेषत: महामार्गावरील ऐतिहासिक ठिकाणांबाबत ठोस निर्णय झाले नसल्याने रुंदीकरणाची गती मंदावली आहे. त्यामुळे ऐतिहासिक जागेचा सकारात्मक विचार करून उपाययोजना होणे अपेक्षित आहे; पण महामार्ग प्राधिकरणाला यासाठी मुहूर्त कधी सापडणार, असा प्रश्न समोर येऊ लागला आहे.
महामार्ग रुंदीकरणामुळे वाहतुकीच्या अडचणींवर मात केली आहे. त्याचबरोबर प्रवाशांचा वेळही वाचला आहे. विशेषत: खंबाटकी घाटातील अपघातांना आळा बसला आहे; पण याच घाटाच्या मध्यावर असणारे पुरातन खामजाईचे मंदिर व ऐतिहासिक खामटाके याबाबत महामार्ग प्राधिकरणाने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही, त्यामुळे या ठिकाणच्या रुंदीकरणाचे काम खोळंबलेले आहे. वास्तविक खामजाईचे मंदिर व पाण्याचे खामटाके हा इतिहासाचा प्राचीन पुरावा आहे तसेच याच मंदिराकडे येणारा शिवकालीन राजमार्गही आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा जपून महामार्गाचे विस्तारीकरण व्हावे, अशी भूमिका स्थानिक शिवप्रेमी व ग्रामस्थांनी घेतली होती.
प्रशासनाला हे मंदिर हटविण्याशिवाय रुंदीकरण करण्यास अद्याप दुसरा मार्ग निघालेला नाही. त्यामुळे या ठिकाणच्या सुमारे अर्धा किलोमीटरच्या रस्त्याचे काम तसेच ठप्प आहे. संपूर्ण घाटात तिहेरी रस्ता झाला असताना या जागी केवळ जुनाच एकेरी रस्ता असल्याने येथे वाहतुकीचा खोळंबा होतो. अनेकदा कंटेनर अडल्यास पूर्ण वाहतूक ठप्प होते. खंबाटकी घाटातून दिवसाला सुमारे पंधरा हजार वाहने ये-जा करत असतात. रस्त्याच्या सुविधेमुळे घाटातील प्रवासात इंधनाचीही बचत होत असते. त्यामुळे उर्वरित कामासह खामजाई मंदिराबाबत योग्य उपाययोजना केव्हा निघणार? प्रशासन यासाठी दिरंगाईची भूमिका का घेत आहे, असा प्रश्न वाहनचालक व प्रवाशांमधून विचारला जात आहे.
पारगाव येथे असलेल्या भीमाशंकर मंदिराचाही प्रश्न असाच प्रलंबित आहे. पारगाव ग्रामस्थांनी महामार्गावर मोठा उड्डाणपुलाची सुविधा निर्माण करण्यासाठी या मंदिराच्या विस्थापनाला व नव्या जागी जीर्णोद्धार करण्याला सहमती दर्शविली आहे. तरीही हायवे प्रशासनाकडून याबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. उड्डाणपूल उभारणी झाल्यावर सेवारस्त्यासाठी या मंदिराचे विस्थापन होत असले तरी सर्व सुविधा प्राधिकरणाने उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांची आहे.सेवारस्त्यांची कामे तातडीने पूर्ण कराशिरवळ ते खंबाटकी घाटापर्यंत अनेक ठिकाणी सेवारस्त्यांची कामे अपूर्ण असल्याने स्थानिक ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना महामार्गावरून ये-जा करावी लागते, त्यामुळे अनेकदा भीषण अपघातांना सामोरे जावे लागते. सेवारस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करून अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.चौपाळा येथील पाणपोई संग्रहालयात !महामार्गावर शिरवळ येथील चौपाळा येथे असणारी शिवकालीन पाणपोई सध्या रस्ता रुंदीकरणात येत आहे. ही पाणपोई काढून त्याची पुनर्स्थापना करणे गरजेचे आहे. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज इतिहास संग्रहालयात ही पाणपोई संग्रही ठेवण्याबाबत व ऐतिहासिक बांधकामाचा हा नमुना पुढील पिढीला पाहण्यासाठी उपलब्ध राहावा, याची खबरदारी हायवे प्रशासनाने घ्यावी, अशी अपेक्षा शिवप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.
खामजाई मंदिर हे पुरातन असून, ते खंडाळा ग्रामस्थांच्या श्रद्धेचे ठिकाण आहे. रस्ता रुंदीकरण आवश्यक असले तरी या ऐतिहासिक ठिकाणे व वास्तू यांचा ठेवा जपणे गरजेचे आहे. प्राधिकरणाने यावर योग्य उपाययोजना करून पाऊल उचलावे.- शैलेश गाढवे, खंडाळा