पिंपोडे बुद्रुक : सर्वसामान्यांच्या आहारात प्रामुख्याने वापरली जाणारी ज्वारी घाऊक बाजारात जेमतेम प्रतिकिलो पंचवीस ते तीस रुपये इतक्या निचांकी दराने विकली जात असल्याने ज्वारी खरेदी ग्राहकांची दिवाळी तर उत्पादकांची दिवाळखोरी, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
उत्तर कोरेगाव तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते; परंतु अलीकडील काही वर्षांत मजुरी व तत्सम कारणांमुळे काही शेतकरी ज्वारी उत्पादनाकडे पाठ फिरवत आहेत. त्याचा परिणाम ज्वारी उत्पादनावर होत असला तरी ज्वारीच्या दरात किफायतशीर वाढ होत नसल्याने ज्वारी उत्पादक शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. सध्या ज्वारीची काढणी, खोडणी व मळणी हंगाम सुरू आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पेरणी व इतर बाबींव्यतिरिक्त केवळ काढणीपासून मळणीपर्यंत एकरी १२ ते १३ हजार इतका खर्च येत आहे. याउलट सध्या घाऊक बाजारात ज्वारी २७०० ते ३००० प्रति क्विंटल दराने विकली जात आहे. त्यामुळे उत्पादनातून मिळणाऱ्या रकमेपेक्षा उत्पादन खर्च अधिक अशी स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, सद्य:स्थितीचा विचार करता सर्वच शेतीमालासाठी उत्पादन खर्चात बचत करून शेतीमाल विक्रीसाठी उत्पादक ते ग्राहक अशी व्यवस्था अधिक भक्कम करण्याची गरज अधोरेखित होत आहे.
(कोट)
बियाणे, पेरणी, मशागत, औषध फवारणी, काढणी, मळणी याचा एकत्रित खर्च विचारात घेता एक एकर क्षेत्र ज्वारी उत्पादनासाठी सरासरी १६ ते १७ हजार खर्च येतो. त्याऐवजी वातावरणीय परिस्थिती व इतर बाबी विचारात घेता ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना अगदीच नगण्य उत्पादन मिळते. त्यामुळे शेतकरी ज्वारी उत्पादनाकडे पाठ फिरवीत आहेत.
- अमोल भोईटे, शेती औषध बियाणे विक्रेते, करंजखोप