सातारा : मांगल्याचे प्रतीक असलेल्या दिवाळी सणास रविवारी वसुबारसने प्रारंभ झाला. साताऱ्यातील पंचपाळी हौद येथे गृहिणींच्या वतीने गाय व वासराचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. हळद-कूंक लावून व फुलांच्या माळा घालून गायीचे पूजन करण्यासाठी गृहिणींचे दिवसभर रेलचेल सुरू होती. पुजन केल्यानंतर गायीला पुरणपोळीचा नैवद्य दाखविला जात होता.वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असा आठवडाभर दिवाळी हा सण उत्साहात साजरा केला जातो. वेगवेगळ्या प्रांतात हा सण साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. मात्र, महाराष्ट्रीयन संस्कृतीत वसुबारस म्हणजे गोधनाच्या पूजेपासून दिवाळी सणाला प्रारंभ होतो.रविवारी सकाळी शहरातील पंचपाळी हौद येथे गाय व वासरांची विधिवत पद्धतीने पूजाअर्चा करण्यात आली. सकाळपासूनच शहर व परिसरातील गृहिणींची गायींचे पूजन करण्यासाठी या ठिकाणी गर्दी झाली होती. प्रामुख्याने ग्रामीण भागात वसुबारस या सणाला अधिक महत्त्व आहे. शेतकºयांनी आपल्याकडे असलेल्या गाय व वासरांना सकाळी अंघोळ घालून, हळद-कुंकू लावून, अक्षता वहिल्या. तसेच फुलांच्या माळा घालून त्यांचे पूजन केले. त्यानंतर गायींचा पुरणपोळी व गुळाचा नैवैद्य दाखविला. ग्रामीण भागात परंपरेनुसार हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गोधनाच्या पूजनाने दिवाळी सणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 11:07 PM