लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : विचारपूर्वक व नियोजन करून शेती केली का फायद्याची ठरते. पण, निसर्गाशी सामना करताना अनेकवेळा बळिराजाचे कंबरडे मोडते. असे असतानाच अनेकवेळा शेतीकामासाठी वेळेवर मजूर मिळत नाहीत. मोक्याच्या काळात शेतकऱ्यांना मजूर मिळतील का मजूर असे म्हणत सर्वत्र शोधण्याची वेळ येते. त्यामुळे नुकसानीचाही सामना करावा लागतो. परिणामी शेतकऱ्यांचा कल यंत्राकडे वाढताना दिसून येत आहे.
शेती फायद्याची ठरते तसेच तोट्याचाही व्यवसाय होतो. विचारपूर्वक, अभ्यासपूर्ण आणि नियोजनाने शेती केली तरी तोटा होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कारण, निसर्गाच्या अवकृपेमुळे एखादा हंगाम तोट्यात जाईल, पण, नियोजनबद्ध शेती केल्यास उभे राहता येते. असे असले तरी शेतीसाठी मजुरांची कमतरता खूप जटिल समस्या बनून राहिली आहे. यामुळे शेती करताना मजुरांचा खूप विचार करावा लागत आहे. त्यातच मजुरांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मजूर शोधण्यापेक्षा अनेकवेळा यंत्रांचाही आधार घ्यावा लागतो. हेही फायद्याचे ठरू लागल्याचे चित्र आहे.
शेती करताना वेळ महत्त्वाची असते. पाऊस झाल्यानंतर वापसा आल्यावर वेळेत पेरणी केली तरच पीक चांगले येते. चुकून ओल उडाल्यानंतर पेरणी केली तर खर्च वाया जातो. पिकांना पाणी देणे असो किंवा भांगलणी वेळेतच अपेक्षित असते. अन्यथा उत्पादनाला फटका बसतो, असे शेतकरी प्रल्हाद आटपाडकर यांनी सांगितले.
शेतीत मजूर टंचाई मोठी समस्या आहे. त्यावर यांत्रिकीकरणाचा पर्याय आला आहे. मजुरांच्या समस्येवर उपाय म्हणून शेतीत आम्ही पाॅवरटिलर, रोटावेटरचा वापर करतो. तसेच काही पीककाढणी व मळणीच्या काळात यंत्राचा आधार घेण्याचे काम करतो. त्यामुळे ऐन मोक्याच्यावेळी मजूर शोधण्याची वेळ येत नाही, असे दत्ता साळुंखे यांनी स्पष्ट केले.
मजुरी वाढत चालल्याने शेतीचा खर्च वाढतच चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाण कमी झाले आहे. यातून शेतकऱ्याला सावरायचे असेल तर नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करावा लागेल. शेतीत आधुनिकीकरण आणले पाहिजे तरच शेती व्यवसाय हा तोट्याचा न राहता सतत फायद्याचाच होईल, असा विश्वास विनायक पवार यांनी व्यक्त केला.
मजुरीचा दर
पाच वर्षांपूर्वीचा दर
पुरुष मजूर : २५० रुपये
महिला मजूर : १५० रुपये
यंदाचा मजुरी दर
पुरुष मजूर : ४०० रुपये
महिला मजूर : २५० रुपये
यंत्राने होणारी कामे
कृषी क्षेत्रात सतत नवनवीन शोध लागत आहेत. त्यामुळे यंत्राच्या सहाय्याने पेरणी, ढेकळे फोडणे, खुडणी, मळणी अशी कामे होतात.
कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा
शेतीसाठी मजुरांची टंचाई ही नेहमीची समस्या आहे. यामुळे शेतकरी यंत्राच्या सहाय्याने शेती करू लागले आहेत. यासाठी पाॅवरटिलर, पाॅवर विडर, रोटावेटर अशी यंत्रे वापरत आहेत. त्याचबरोबर चिखलणी करणारी यंत्रे आली आहेत तशी पिके खुडणारी आणि मळणी करणाऱ्या यंत्रांचाही वापर शेतकरी करताना दिसत आहेत.