ओमायक्रॉनची भीती नको...,पुरेशी काळजी घेणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 06:51 PM2021-12-24T18:51:41+5:302021-12-24T19:02:50+5:30
ओमायक्रॉन रुग्णामुळे एकाही आरोग्य कर्मचाऱ्याला ओमायक्रॉनची लागण झालेली नाही. त्याचा प्रादुर्भाव कुठेही झालेला नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
सातारा : डेल्टापेक्षा ओमायक्रॉन तिप्पट अधिक वेगाने पसरण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. त्यातच जिल्ह्यात आतापर्यंत फलटण तालुक्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण होते.
मात्र, सद्य:स्थितीत तरी ओमायक्रॉन रुग्णामुळे एकाही आरोग्य कर्मचाऱ्याला ओमायक्रॉनची लागण झालेली नाही. त्याचा प्रादुर्भाव कुठेही झालेला नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
जगातील ७७ देशांमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाला आहे. हा विषाणू डेल्टा विषाणूपेक्षाही जास्त वेगाने पसरत असल्याची परिस्थिती परदेशात दिसून आले आहे. जिल्ह्यात परदेशातून आलेले तीनजण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूची लागण झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त झाला आहे.
त्यामुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; पण त्यातील कोणत्याही रुग्णाची प्रकृती चिंताजनक किंवा रुग्णालयात दाखल करण्याइतपत बिघडल्याचे आढळले नाही. परिणामी ओमायक्रॉनची भीती बाळगण्यापेक्षा कोरोना नियमावलींचे पालन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
शहरात आलेल्या व ओमायक्रॉनच्या रुग्णांना कोणतीही लक्षणे नव्हती. विशेष म्हणजे या रुग्णांना एक्स-रे किंवा सिटी स्कॅन करण्याचीही गरज लागलेली नाही. कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांना ज्या पद्धतीने उपचार दिले जातात त्याच पद्धतीने ओमायक्रॉनच्या रुग्णांनाही उपचार दिले जात आहेत. - डॉ. जयदीप चव्हाण, सातारा
तालुकानिहाय परदेशातून आलेल्यांची संख्या
तालुका प्रवासी न सापडलेला प्रवासी
जावली : ८ १
कऱ्हाड : १३४ १
खंडाळा : २० ०
खटाव : ३६ १
कोरेगाव : २९ १
महाबळेश्वर : १५ २
माण : १३ ०
पाटण : १३ ०
फलटण : ३८ ०
सातारा : १९९ १४
वाई : ४९ ०
एकूण परदेशातून आलेले सातारकर : ५५४
आरटीपीसीआर टेस्ट केलेले : ३३२
बाधित - ४
ओमायक्रॉन बाधित : ३
ओमायक्रॉन बाधितांच्या संपर्कातील पॉझिटिव्ह : २
बाधित ओमायक्रॉन रिपोर्ट प्रतीक्षेत : २
कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव डेल्टापेक्षा अधिक वेगाने होत आहे.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना किंवा कोरोनावर मात केलेल्यांमध्येही या नवीन विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.
कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका असणाऱ्या भागांमध्ये रुग्णसंख्या तीन दिवसांमध्ये दुप्पटीने वाढते
ओमायक्रॉनपासून बचावाचा मार्ग लसीकरणाचा नसून मास्क वापरण्याचा आहे, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय
सोशल डिस्टन्सिंग, व्हेंटिलेशन आणि आरोग्यदायी वातावरण सध्या यावर मात करण्यासाठी सर्वोत्तम आहे.