बाजारपेठ बंद नको; निर्बंध घाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:39 AM2021-04-07T04:39:57+5:302021-04-07T04:39:57+5:30
कऱ्हाड : गतवर्षीच्या लॉकडाऊननंतर डबघाईस आलेली आर्थिक स्थिती सुधारत असतानाच प्रशासनाने पुन्हा मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनला ...
कऱ्हाड : गतवर्षीच्या लॉकडाऊननंतर डबघाईस आलेली आर्थिक स्थिती सुधारत असतानाच प्रशासनाने पुन्हा मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनला कऱ्हाड शहरासह तालुक्यातील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला असून मंगळवारी व्यापाऱ्यांनी त्याविरोधात आवाज उठवला. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. निर्बंध घाला; पण बंद नको, असे साकडे यावेळी घालण्यात आले.
दरम्यान, शहरातील बाजारपेठेवर अनेकांची उपजीविका चालते. हजारो मजूर, कामगार याठिकाणी काम करतात. जर महिनाभर बाजारपेठ बंद राहिली तर उपजीविका कशावर चालवायची असा प्रश्न उपस्थित करून पोटावर पाय आणणाऱ्या या ‘मिनी लॉकडाऊन’ला सर्वसामान्यांनीही विरोध दर्शविला आहे.
जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी जारी केले आहेत. या आदेशावर विक्रेते, व्यापाऱ्यांसह बाजारपेठेवर उपजीविका असणाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मिनी लॉकडाऊनला त्यांनी विरोध दर्शवला आहे. गेले वर्षभर कोरोनाच्या दुष्टचक्रात व्यापारी वर्ग भरडला गेला असताना पुन्हा लॉकडाऊनची आपत्ती आली आहे. दुकाने काही वेळ सुरू ठेवण्यास सवलत मिळावी, अशी मागणी मंगळवारी व्यापाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन केली. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिवांशी बोलण्याचे आश्वासन चव्हाण यांनी व्यापाऱ्यांना दिले. जितेंद्र ओसवाल, नितीन ओसवाल, चेतन मेहता, राहुल शहा, बाळासाहेब भंडारी, मोहसीन बागवान, अशिर बागवान, अंकुर ओसवाल यांनी व्यापाऱ्यांची बाजू मांडली. माजी नगरसेवक अशोकराव पाटील, राहुल चव्हाण उपस्थित होते.
- चौकट
... तरीही पृथ्वीराज चव्हाण भेटले !
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर कऱ्हाडातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी एकत्रित येत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. चव्हाण यांनी सोमवारीच उपजिल्हा रुग्णालयात लस घेतली असून प्रकृती ठिक नसतानाही त्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
- चौकट
व्यापाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे !
व्यापाऱ्यांनी प्राधान्याने लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे सांगून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे यांच्याशी फोनद्वारे त्याबाबत चर्चा केली. शहरातील व्यापाऱ्यांना लसीकरणासाठी वेगळी सोय उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी केली. त्यावर शिंदे यांनी शहरात चार ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू असून यातील एका केंद्रावर व्यापाऱ्यांच्या लसीकरणाची सोय करण्यात येईल, असे सांगितले.
फोटो : ०६केआरडी०४
कॅप्शन : कऱ्हाडातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या.