कऱ्हाड येथे शासकीय विश्रामगृहावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेखर सिंह म्हणाले, आजपासून दुकान, रेस्टॉरंट, वाईन शॉप, बियर बार, मंगल कार्यालये आदी ठिकाणी गर्दी दिसली. त्यांनी वेळेच्या नियमांचे उल्लंघन केले, तर त्यांना आर्थिक दंडाबरोबर त्यांचा व्यवसाय सात दिवस सील करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणार आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाडमध्ये बेड मॅनेजमेंट व्यवस्थित करण्यात आली आहे. त्यादृष्टीने कृष्णा, सह्याद्री, शारदा आदी हॉस्पिटलकडून व्यवस्थित माहिती घेतली असून, कोणतीही अडचण येणार नाही. तसेच टेस्टिंग व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
चौकट
त्यांना शोधून गुन्हे दाखल करणार
बगाड यात्रेच्या गर्दीबाबत छेडले असता, शेखर सिंह म्हणाले, यात्रा कमिटीने गर्दी करणार नाही, असा शब्द दिला होता; पण तो पाळला नाही. गर्दीप्रकरणी आत्तापर्यंत ८२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने संबंधितांना कालच जामीन मिळाला आहे. यात अजूनही काही लोक दोषी आहेत. त्यांचा शोध सुरू असून, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.