खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढत गेला पण लोकांना योग्य उपचार देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. मात्र जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाची आकडेवारी कमी येत असताना खंडाळा तालुक्याचा आकडा का कमी होत नाही ही मोठी खंत आहे . कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने केवळ कागदावर काम न करता प्रत्यक्ष गावागावात पोहचून गावात येणाऱ्या अडचणी सोडविल्या पाहिजेत, अशा सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केल्या.
आ. पाटील म्हणाले, खंडाळा तहसील कार्यालयात तालुक्याच्या कोरोनाबाबत सद्य स्थितीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, सभापती राजेंद्र तांबे, जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार, औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष बंडू ढमाळ , तहसीलदार दशरथ काळे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, डॉ. रवींद्र कोरडे, मुख्याधिकारी परदेशी यांसह अधिकारी उपस्थित होते .
तालुक्यातील शिरवळ, लोणंद, शिंदेवाडी यांसह काही गावातून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही. तालुक्यातील पॉझिटिव्ह दर कमी होत नाही हे दुर्दैव आहे. रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहून काम करायला हवे. लोकांच्या आरोग्याबाबत दुर्लक्ष केल्यास खपवून घेतले जाणार नाही . प्रत्येक गावात सुरु केलेल्या विलगीकरण कक्षाकडे काटेकोरपणे लक्ष ठेवा. आगामी काळात तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्यामध्ये लहान मुलांना प्रादुर्भाव होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे . त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत मात्र त्यासाठी प्रशासनाने झोकून देऊन काम करायला हवे.
(चौकट)
पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
रवळमध्ये कोरोना काळात गटविकास अधिकारी यांनी ग्राम समितीची एकही बैठक घेतली नाही. त्यांचे ग्रामसेवक काय काम करतात याची माहिती पदाधिकाऱ्यांना दिली जात नाही. शिरवळच्या कोरोना प्रसाराला पोलीस यंत्रणाही कारणीभूत आहे. त्यांची कामात टाळाटाळ असते. कंपनी कामगारांची चोख तपासणी करण्यात यंत्रणा फोल ठरली आहे असे ताशेरे जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी ओढले. याबाबत योग्य ती कार्यवाही करून खबरदारी घेण्याच्या सूचना आमदार मकरंद पाटील यांनी दिल्या.
फोटो : ०८ खंडाळा न्यूज
खंडाळा तहसील कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत आ. मकरंद पाटील यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.