कऱ्हाड : तालुक्यातील कोरोना संक्रमणाचा वेग दिवसेंदिवस वाढत असताना, सुपने, हजारमाची आणि सैदापूर ही तीन गावे ‘हॉट स्पॉट’ ठरत आहेत. सैदापूरमध्ये सव्वाशेपेक्षा जास्त ‘अॅक्टिव्ह’ रुग्ण असून तालुक्यातील अन्य काही गावे रुग्णसंख्येत पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहेत.
कोरोना संक्रमणाचा वेग एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर वाढला. त्यामुळे बाजारपेठेच्या गावांसह अन्य गावांमध्येही कोरोनाचा नव्याने शिरकाव झाला. एका महिन्यात काही गावांतील स्थिती भयावह बनली. सुपने, सैदापूर आणि हजारमाची ही त्यापैकीच तीन गावे. या तीन गावांमधील परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. सुपने गावातील वीस कुटुंबे सध्या बाधित आहेत. या वीस कुटुंबांमध्ये ५४ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी १३ रुग्णालयांत, तर ३९ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.
सैदापूर हे विभागातील जास्त लोकसंख्येचे गाव आहे. विद्यानगरचा निमशहरी भागही याच ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येतो. सध्या या गावातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सव्वाशेपेक्षा जास्त आहे.
हजारमाचीही धास्तावली असून या ग्रामपंचायतीअंतर्गत ओगलेवाडीचा समावेश होतो. ओगलेवाडी हे विभागातील बाजारपेठेचे ठिकाण आहे. त्यामुळेच याठिकाणी संसर्ग वाढल्याची शक्यता नाकारता येत नाही. सैदापूरमध्येही विद्यानगरचा निमशहरी भाग असल्यामुळे तेथील वाढते संक्रमण समजून येऊ शकते. मात्र, सुपने गावात रुग्णवाढीला कसलाच वाव नाही. आठवडी बाजार वगळता याठिकाणी गर्दीही होत नाही. मात्र, तरीही रुग्णसंख्या वेगाने वाढली. संक्रमण कशामुळे फैलावले आणि रुग्ण का वाढले, याचा विचार आता ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनीच करावा.
- चौकट
कऱ्हाडात ३९१, मलकापुरात २५५ रुग्ण
कऱ्हाड आणि मलकापूर शहरातील स्थितीही चिंतनीय आहे. कऱ्हाड शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३९१ असून मलकापुरात २५५ रुग्ण उपचाराखाली आहेत. या दोन्ही शहरांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, तरीही संक्रमण थांबत नसल्याची परिस्थिती आहे. दररोजच्या अहवालात या दोन्ही शहरात प्रत्येकी दहापेक्षा जास्त बाधित आढळून येत आहेत.
- चौकट
‘हॉट स्पॉट’ गावे...
सैदापूर : १२१
हजारमाची : ६०
सुपने : ५४
- चौकट
पन्नाशीच्या उंबरठ्यावर...
काले : ४९
कोपर्डे हवेली : ४६
रेठरे बुद्रुक : ४३
गोवारे : ४०
- चौकट
वीसपेक्षा जास्त रुग्ण...
कोयना वसाहत : ३८
कासारशिरंबे : ३४
उंब्रज : ३३
मसूर : ३३
विरवडे : २९
जखिणवाडी : २९
शेवाळवाडी : २७
शेरे : २६
कार्वे : २६
कापिल : २५
वडगाव हवेली : २३
गोळेश्वर : २२
सवादे : २१
- चौकट
गावांचा लेखाजोखा
एकूण बाधित : १९०
कोरोनामुक्त : ४३
कंटेन्मेंटमध्ये : १४६
- चौकट
कोरोना ‘अपडेट’
एकूण बाधित : १५०२२
कोरोनामुक्त : १२२९९
दुर्दैवी मृत्यू : ३९०
उपचारात : २३३३
(आरोग्य विभागाच्या २ मे रोजीच्या अहवालानुसार)