अपघातानंतर पळालेल्या कारचालकास आनेवाडी टोलनाक्यावर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:52 AM2021-02-20T05:52:04+5:302021-02-20T05:52:04+5:30
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ हद्दीमध्ये वीर, समगीरवाडी येथील नथुराम समगीर कामानिमित्त आले होते. नथुराम समगीर हे ...
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ हद्दीमध्ये वीर, समगीरवाडी येथील नथुराम समगीर कामानिमित्त आले होते. नथुराम समगीर हे शिर्के पेपर मिलजवळील महामार्ग ओलांडत असताना पुणे बाजूकडून सांगली बाजूकडे भरधाव वेगाने निघालेल्या आलिशान कारने (एमएच १० डीडी १०१) नथुराम समगीर यांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की समगीर हे धडकेनंतर कारच्या काचेवर जोरदार आदळले. त्यानंतर महामार्गाच्या कडेला पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये कारच्या काचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. शिरवळ पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे, अरुण भिसे, स्वप्नील दौंड, अमोल जगदाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. कारची माहिती तत्काळ आणेवाडी टोलनाका व्यवस्थापनाला देत कारचा पाठलाग केला. यावेळी आनेवाडी टोलनाका व्यवस्थापक अरुण राजमाने, प्रवीण शिंगटे, बूथचालक अश्विनकुमार कोळेकर व भुईंज पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार गोकुळ बोरसे यांच्या मदतीने कारचालक संजय शंकर माने (वय ३७, रा. मिरज, सांगली) याच्या मुसक्या आवळल्या. अपघातप्रकरणी शिरवळ पोलिसांनी अटक केली. यावेळी संजय माने याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे तपास करीत आहेत.
१९शिरवळ
शिरवळ हद्दीत याच कारची धडक झाल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. (छाया : मुराद पटेल, शिरवळ )