रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली गावात निर्जंतुकीकरणासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने लहान ट्रॅक्टरच्या माध्यमातून सोडियम क्लोराईड या औषधांची फवारणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही उपाययोजना करण्यात आली.
कोरेगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याला वाठार किरोली गावही अपवाद राहिलेले नाही. गावात काही प्रमाणात बाधित रुग्ण सापडत आहेत. लॉकडाऊन असला तरी परिसरातील गावांमध्येही बाधित रुग्ण सापडत आहेत. गतवर्षीसारखी गावामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी विविध उपाययोजनांच्या माध्यमातून सक्रिय झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावातील गल्लोगल्ली लहान ट्रॅक्टरच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी केली जात आहे. एकही गल्ली व रस्ता औषध फवारणीपासून राहू नये, यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक फिरून लक्ष ठेवत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून शासनामार्फत लसीकरण सुरू करण्यात आले आहे. संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने बैठका घेण्यात आल्या असून विविध उपाययोजना राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. लोकसेवक या नात्याने सर्व ग्रामस्थांसह जिल्हा परिषद गटातील जनतेचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य केले जात आहे. नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांनी केले आहे.
फोटो : वाठार किरोली, ता. कोरेगाव येथे ग्रामपंचायतीमार्फत संपूर्ण गावात औषध फवारणी करण्यात आली. (छाया : जयदीप जाधव)