वाईच्या पूर्व भागावर दुष्काळाचे ‘विघ्न’ कायम
By admin | Published: September 10, 2014 10:12 PM2014-09-10T22:12:10+5:302014-09-11T00:13:55+5:30
पावसाची प्रतीक्षा संपेना : पाण्याअभावी गणेशमूर्तींचे इतरत्र विसर्जन
कवठे : वाई तालुक्याच्या पूर्व भागात यंदा पावसाने ओढ दिल्याने जलस्तोत्रांची स्थिती गंभीर झाली आहे. विहिरी व ओढे कोरडे पडल्याने पूर्व भागावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पाणी नसल्याने यंदा पूर्व भागातील गणेशमंडळांना देखील गणेशमूर्तींचे विसर्जन वाई व सोनेश्वर या ठिकाणी करावे लागले.
पूर्व भागात शिवारातून वाहणारे ओढे हेच मुख्य जलस्तोत्र आहे. जास्तीत जास्त विहिरी या ओढ्यालगतच आहेत. यंदा या परिसरात कमी पाऊस झाल्याने ओढ्यांना पाणीच आले नाही. परिणामी कवठे, केंजळ, सुरूर, चांदक, गुळुंब, वेळे या परिसरातील विहिरींची पाणीपातळी खालावली आहे.
या सर्व परिसराला तारक असलेल्या ओढ्यांना पूर आल्यास विहिरींची पाणीपातळी वाढते व वर्षभर शेतीस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध होतो; परंतु यंदा परिसरातील ओढ्यांना एकही पूर आला नसल्याने सर्वच ओढ्यांचे पात्र कोरडे ठणठणीत पडले आहे. निसर्ग कोपल्याने यंदा गणेश विसर्जन करायचे कोठे? हा प्रश्न परिसरातील गणेशभक्तांना सतावत होता. यावर उपाय म्हणून घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशमूर्तींचे विसर्जन वाई व सोनेश्वर, ओझर्डे येथे कृष्णा नदीत करावे लागले.
हत्ती नक्षत्रात पाऊस पडला नाही तर वाई तालुक्याच्या पूर्व भागास भीषण दुष्काळास सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण होणार असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे. त्यामुळे आता ‘हत्ती’ नक्षत्र तारणार की मारणार? अशी परिस्थिती तालुक्याच्या पूर्व भागात निर्माण झाली आहे. (वार्ताहर)