पावसामुळे ओढे कचऱ्याने तुडुंब
सातारा : जिल्ह्यासह सातारा शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील ओढे-नाले कचऱ्याने तुडुंब भरले आहेत. डोंगर उतारावरून मोठ्या प्रमाणात कचरा वाहत आल्याने पाण्याचा प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे ओढे-नाल्यांमधील पाणी रस्त्यावरुन वाहू लागले आहे. सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सोमवारी दिवसभर शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कोडोली, गोडोली या भागातही पालिकेने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघन
सातारा : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदीचा कालावधी १ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत सर्वप्रकारच्या अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, किराणा व भाजीपाला घरपोच उपलब्ध करण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु, यासाठीही वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. असे असले तरी बहुतांश दुकानदार सकाळी अकरानंतर दुकानाचे शटर बंद करून व्यवसाय करत आहेत. काही दुकाने तर पाठीमागच्या बाजूने सुरू ठेवली जातात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. तरीही दुकानदारांनी ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही.
वाहनधारकांची फरपट सुरूच
सातारा : मोळाचा ओढा ते कोंडवे या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने अर्धा रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे एकाच बाजूने वाहनधारकांची ये-जा सुरू असते. रात्रीच्या वेळी खोदण्यात आलेला रस्ता व रस्त्यावरील खड्डे वाहनधारकांच्या नजरेस पडत नसल्याने लहान-मोठे अपघात होत आहेत. संबंधित विभागाने या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
कास तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ
पेट्री : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. या तलावातून सातारा शहराला दररोज साडेपाच लाख लीटर पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे तलावाची पातळी दररोज एक इंचाने कमी होते. काही दिवसांपूर्वी तलावात नऊ फूट पाणीसाठा शिल्लक होता. त्यामध्ये हळूहळू वाढ होऊ लागल्याने सातारकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.