एसटी प्रवासात दहा तोळ्याचे दागिने लंपास, विवाह समारंभ पडला महागात 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 01:20 PM2023-06-19T13:20:28+5:302023-06-19T13:20:46+5:30

विवाहाला जायचे असल्यामुळे दागिने तपासले असता दागिन्यांचा बॉक्स बॅगमध्ये नसल्याचे निदर्शनास आले

During the ST journey jewels worth ten tolas were stolen in satara | एसटी प्रवासात दहा तोळ्याचे दागिने लंपास, विवाह समारंभ पडला महागात 

एसटी प्रवासात दहा तोळ्याचे दागिने लंपास, विवाह समारंभ पडला महागात 

googlenewsNext

कऱ्हाड : नातेवाइकाच्या विवाहासाठी गावी आलेल्या महिलेचे दहा तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. स्वारगेट ते गिरेवाडी एसटी प्रवासादरम्यान ही घटना घडली. याबाबत भारती नवनाथ माने (रा. कोथरुड-पुणे, मुळ रा. गिरेवाडी, ता. पाटण) यांनी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरेवाडी येथील भारती माने या कुटुंबासह कोथरुड-पुणे येथे वास्तव्यास आहेत. १२ जून रोजी त्यांच्या एका नातेवाइकाचा गावी विवाह सोहळा होता. या विवाहासाठी ११ जून रोजी भारती माने या पती नवनाथ यांच्यासोबत गावी येण्यासाठी निघाल्या. स्वारगेट बसस्थानकातून त्या कोल्हापूर एसटीमध्ये बसल्या. विवाहात घालण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडील दहा तोळ्याचे दागिने एका बॅगमध्ये ठेवून त्या बॅगमध्ये दागिन्यांवर कपडे ठेवले होते. संबंधित बॅग त्यांनी प्रवासावेळी एसटीच्या रॅकमध्ये ठेवली होती. 

स्वारगेटमधून निघालेली एसटी दुपारी खंडाळा येथील एका हॉटेलवर थांबली. त्यावेळी भारती व पती नवनाथ हे दोघे जेवणासाठी एसटीतून उतरले. त्यानंतर एसटी पुन्हा मार्गस्थ झाली. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उंब्रजमध्ये आल्यानंतर भारती व नवनाथ हे दोघेजण एसटीतून उतरले. तेथून ते दुसऱ्या एसटीने त्यांच्या गावी गिरेवाडी येथे पोहोचले. रात्री जेवण आटोपल्यानंतर कुटुंबीयांसमवेत ते झोपी गेले. 

दुसऱ्या दिवशी विवाहाला जायचे असल्यामुळे भारती यांनी कापडी बॅग उघडून त्यामध्ये असलेले दागिने तपासले असता दागिन्यांचा बॉक्स बॅगमध्ये नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शोधाशोध करूनही त्यांना बॉक्स सापडला नाही. त्यानंतर त्यांनी पुण्याला परत जाऊन घरामध्येही शोध घेतला. मात्र त्यांना दागिने मिळून आले नाहीत. याबाबत त्यांनी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हवालदार नानासाहेब कांबळे तपास करीत आहेत.

चोरट्यांनी लंपास केले दोन गंठण

स्वारगेट ते गिरेवाडी या प्रवासादरम्यान अज्ञाताने दागिने चोरल्याचा संशय आल्यामुळे भारती माने यांनी याबाबतची फिर्याद मल्हारपेठ पोलिस ठाण्यात दिली. चोरट्यांनी २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सहा तोळ्याचे गंठण तसेच १ लाख ६० हजार रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे गंठण लंपास केले आहे.

Web Title: During the ST journey jewels worth ten tolas were stolen in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.