पाटण तालुक्यातील दुसाळेफाटा ते दुसाळे गाव पोहोच रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाले. सुमारे अडीच किलोमीटर रस्त्यासाठी एक कोटी ४० लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून हा निधी मिळाला आहे. २०१८ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र आता तीन वर्षे होत आली तरी काम अपूर्णावस्थेत आहे. काम पूर्ण करण्याचा कालावधीही पूर्ण होऊन दीड वर्ष झाले आहे. मात्र अद्याप काम पूर्ण झालेले नाही. यामागचे नक्की गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यानच्या काळात रस्त्यावर खडीचा एक थर टाकून झाला आहे. लहान पुलांचे सीडी वर्कही झाले आहे. सद्यस्थितीत अनेक दिवस काम ठप्प आहे. या कामात ठेकेदाराचा हलगर्जीपणा व वेळकाढूपणा ग्रामस्थांच्या जिवावर उठला आहे. रस्त्यावरील खडी उखडून खड्डे पडले आहेत. वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. वाहने घसरून अपघातही होत आहेत. सध्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. ठेकेदाराने अर्धवट स्थितीत काम सोडून दिल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. याकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.