कर्तृत्व ही पुरुषांची मक्तेदारी नाही : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 08:35 PM2019-10-04T20:35:35+5:302019-10-04T23:35:26+5:30

याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेने रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्काराने अनु आगा यांना तर इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Duty is not a monopoly of men: Sharad Pawar | कर्तृत्व ही पुरुषांची मक्तेदारी नाही : शरद पवार

गौरव कर्तृत्वाचा : सातारा येथे शुक्रवारी रयत शिक्षण संस्थेच्या शंभराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘रयत’चे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार व माजी खासदार अनु आगा यांना रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी चेअरमन अनिल पाटील

Next
ठळक मुद्देअनेक विद्यार्थी संशोधक तयार केलेले आहेत व त्यांच्या संशोधनासाठी पेटंट मिळविण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे.’

सातारा : ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजाची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन ‘रयत’च्या माध्यमातून महाराष्ट्रात शिक्षणाचे जाळे निर्माण केले. समाजाच्या गरजा लक्षात घेऊन आपल्या शैक्षणिक धोरणात संस्थेने नेहमीच सकारात्मक बदल घडविले आहेत. कर्तृव ही पुरुषांची मक्तेदारी नसून त्यात महिलांचाही यात वाटा मोठा आहे. भविष्यातही तो वाढत राहावा,’ असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्यावतीने कर्मवीर समाधी परिसरात शुक्रवारी आयोजित संस्थेच्या शंभराव्या वर्धापनदिन कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायणमूर्ती व माजी राज्यसभा सदस्य अनु आगा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेने रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्काराने अनु आगा यांना तर इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

अनु आगा आणि नारायणमूर्ती यांच्या कार्याचा गौरव करून शरद पवार म्हणाले, ‘इन्फोसिस व रयत शिक्षण संस्था, प्रचंड त्यागातून व संघर्षातून उभ्या राहिल्या आहेत, हा त्यांचा समान धागा आहे. तर अनु आगा खडतर परिस्थितीतून उद्योजिका म्हणून यशस्वी ठरल्या आहेत. ही ‘रयत’च्या विद्यार्थिनींसाठी प्रेरणा आहे. कर्तृत्वाच्या बाबतीत स्त्रिया तसूभरही कमी नाहीत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.’

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना अनु आगा म्हणाल्या, ‘आपल्या देशात आरोग्य, पिण्याचे शुद्ध पाणी, कुटुंब नियोजन, लोकसंख्या नियंत्रण, दारिद्र्य, कुपोषण या गंभीर समस्या आहेत. ही आव्हाने सोडवण्यासाठी व्यक्ती, सेवाभावी संस्था, उद्योजक तसेच युवक अशा सर्वांनी वेळ, कौशल्य, ज्ञान देऊन हे प्रश्न सोडविले पाहिजेत.’
इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती म्हणाले, ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली संस्था अविरत परिश्रम करीत १०० वर्षे समाजाची सेवा करीत आहे.

निष्ठा आणि शिस्त घेऊन कृतिशील प्रवास केला आहे. खरोखरच पिण्याचे पाणी, मानवी संसाधन विकास, प्रदूषण हे प्रश्न आजही आहेत. गेल्या ६० वर्षांत ग्रामीण शहरी, गरीब, श्रीमंत भेदभाव तसेच राहिले आहेत. लोकशाही, स्वच्छ भारत, मेरा भारत महान हे सर्व चांगले आहे. मात्र त्यासाठी आपण चांगल्या मूल्यांचा अंगीकार केला पाहिजे.’

संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील म्हणाले, ‘संस्थेने रयत विज्ञान परिषदेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी संशोधक तयार केलेले आहेत व त्यांच्या संशोधनासाठी पेटंट मिळविण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे.’

कार्यक्रमाचे रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य. डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले व १०० वर्षांतील विविध गुणवत्तापूर्ण व प्रगतीशील उपक्रमांचा आढावा घेतला. नारायणमूर्ती आणि अनु आगा यांना देण्यात आलेल्या मानपत्रांचे वाचन प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे व मा. प्रा. डॉ. अनिसा मुजावर यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या उच्चशिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संभाजी पाटील आणि सहकाऱ्यांनी रयतगीत सादर केले. यानंतर रयत जर्नी आॅफ ट्रान्सफॉरमेशन ही ध्वनी चित्रफीत सादर करण्यात आली.

या समारंभास व्हा. चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, सर्व कर्मवीर कुटुंबीय, माध्यमिक विभागाचे सहसचिव विलास महाडिक, संस्थेचे ओएसडी प्रा. शहाजी डोंगरे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आबासाहेब देशमुख, रवींद्र पवार, अ‍ॅड. दिलावर मुल्ला, संजीवकुमार पाटील, आर. के. शिंदे, संस्थेचे सर्व जनरल बॉडी सदस्य, लाईफ मेंबर्स,  चेअरमन अनिल पाटील, एन. आर. नारायणमूर्ती, सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, लाईफ वर्कर्स, विभागीय अधिकारी उपस्थित होते. .




 

Web Title: Duty is not a monopoly of men: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.