सातारा : थोर स्वातंत्र्यसेनानी किसन वीर यांचे नाव घेतल्याशिवाय जिल्ह्यातल्या राजकारण्यांच्या सभा पूर्ण होत नाहीत. मात्र, पोवई नाक्यावरील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात असलेला वीरांचा पुतळा फलकांच्या ग्रहणात अडकलेला या मंडळींना दिसत कसा नाही?, असा सवाल देशप्रेमी नागरिक विचारताना दिसत आहेत.पोवई नाक्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रशासकीय इमारत व शाखा कार्यरत होती. तेव्हा या पुतळ्याकडे विशेष लक्ष दिले जात होते. काही वर्षांपूर्वी प्रशासकीय इमारत जिल्हा परिषदेच्या समोर बांधण्यात आली. हे कार्यालय नवीन इमारतीत गेले. सध्याच्या घडीला जुन्या इमारतीत प्रशिक्षणाचे काम चालते.
इमारतीची भव्यता अजूनही टिकून आहे. पोवई नाक्यावर पूर्वी एवढी मोठी भव्य इमारत अभावानेच होती, त्यामुळे बँकेकडे लगेच लक्ष जात होते. स्वातंत्र्यसेनानी किसन वीर यांच्या पुतळ्याला अभिवादन करूनच बँकेत येणारा प्रत्येक जण प्रवेश करत होता.
आता मात्र परिस्थिती बदलेली पाहायला मिळते. या इमारतीकडे जसे दुर्लक्ष झाले तसे इमारतीभोवती टपऱ्या वाढल्या आणि जाहिरातीचे फलकही! जाहिरात करणाऱ्यांना बहुधा किसन वीरांच्या कर्तृत्वाची उंची माहित नसावी. पोवई नाक्याकडून बसस्थानकाकडे वळताना वीरांचा पुतळा नजरेस पडायचा. आता मात्र या पुतळ्यासमोर जाहिरात फलक उभे राहू लागल्याने वीरांचा पुतळा झाकोळला आहे.
देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात आणि जिल्ह्याच्या राजकारणात किसन वीर आबांचे अमूल्य असे योगदान आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून आबांनी त्यांना मोलाची साथ दिली. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील वीरांचे शिष्य आहेत. त्यांनी कायमच आबांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न केला.
सध्या मात्र वयोमानामुळे लक्ष्मणराव पाटील सक्रिय राजकारणापासून दूर गेले आहेत. त्यातच जिल्हा बँकेच्या राजकारणात नेहमी सहभाग असणाऱ्या किसन वीरांची पुढची पीढीही आता बँकेतून पायउतार झालेली आहे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून आबांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष केले जातेय का?, अशी खंत लोक व्यक्त करताना दिसतात.बांधकाम विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या रस्त्यावर असे फलक उभे राहतात. ते उभे करणाऱ्यांना वेसण घालण्याचे काम यंत्रणा करत नाही, पालिका फलकांना परवानगी देते, ज्या फलकांना परवानगी दिली नाही, ते पालिकाच काढते.
परवानगी दिल्यानंतर संबंधित फलक कुठे लावला आहे? याची खातरजमा पालिका करत नाही, असे स्पष्टपणे दिसते. आबांच्या योगदानाचे गोडवे गाऊन सभा गाजविणाºया त्यांच्या स्वघोषित अनुयायांनाही त्याचे काही पडले नाही, असेच स्पष्टपणे पुढे येते.